तेजीवाले आणि मंदीवाले यांच्या तुंबळ युद्धात सेन्सेक्सला बुधवारी २० हजारांचा जादूई आकडा गाठता आला; दिवसाचे व्यवहार सत्र संपायला १० मिनिटे असताना गाठली गेलेली पातळी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने पुन्हा उंबरठय़ाआड येऊन ठेपली.
मंगळवारच्या द्विशतकी वाढीनंतर तीन महिन्यांच्या उच्चांकावर गेलेल्या मुंबई शेअर बाजाराला आज सलग दुसऱ्या सत्रात १०१.२३ अशी शतकी कमाई करीत २० हजारांच्या काठावर, १९,९९०.१८ वर गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५.७५ अंशांची भर घालत ६ हजारांपुढे, ६,०६९.३० वर कायम राहिला आहे.
गेल्या तीन सत्रांत भांडवली बाजाराने भरघोस तेजी नोंदविली आहे. या कालावधीत सेन्सेक्सची ४१० अंशांची कमाई झाली आहे. बुधवारीही दिवसभरात तो २०,०३७.२७ पर्यंत गेला. ३१ जानेवारीनंतर प्रथमच बाजाराने २० हजाराला गाठले. कंपन्यांचे तिमाही निकाल फायद्याचे येत असल्याने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील खरेदीचा ओघ कायम ठेवला. दिवसअखेर २० हजारांवर मुंबई निर्देशांकाला स्थिरावता आले नसले तरी अगदी शेवटच्या क्षणी गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे मंगळवारच्या तुलनेत शतकी वाढ नोंदवीत बाजार २० हजारांच्या काठावर स्थिरावला.
२०१३ मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांची भांडवली बाजारातील रक्कम १२ अब्ज डॉलर झाली आहे, तर कालच्या व्यवहारात त्यांनी ६५५.२१ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. आशियाई तसेच युरोपीय, अमेरिकी शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण नोंदले गेले. डाऊ जोन्सने तर कालच्या व्यवहारात प्रथमच १५ हजारांचा टप्पा गाठला, तर युरोपातील अनेक शेअर बाजार त्याच्या दिवसाच्या उच्चांकावर स्थिरावले.
ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, तेल व वायू आदी क्षेत्रीय निर्देशांक वधारणेच्या यादीत होते, तर समभागांमध्ये एचडीएफसी, आयटीसी, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आदी सहभागी झाले. सेन्सेक्समधील १४ समभागांचे मूल्य उंचावले होते.

तेजी चिरकाल राहण्याची शक्यता
सध्याच्या राजकीय चित्राकडे दुर्लक्ष करीत सेन्सेक्सने तेजी विस्तारली आहे. निफ्टीचीदेखील ६,००० पुढील वाटचाल कायम आहे. ही वाढ अशीच राहण्याची शक्यता अधिक आहे.
-अमर अंबानी,
संशोधक प्रमुख, इंडिया इन्फोलाइन

‘निफ्टी’ची ६,१२५ पर्यंत आगेकूच शक्य
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या जोरावर सलग दुसऱ्या सत्रात निफ्टी ६,००० वर राहिला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा स्तर नजीकच्या कालावधीत ६,१२६ पर्यंत जाऊ शकतो.
-अ‍ॅलेक्स मॅथ्यू,
संशोधक प्रमुख, जिओजित बीएनपी पारिबास.

२०१२-१३ मधील चालू खात्यातील तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५ टक्क्यांहूनही कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षांत शेवटच्या ७ ते ८ महिन्यात राबविलेल्या अर्थसुधारणांमुळे ते शक्य होईल.
-अरविंद मायाराम
केंद्रीय अर्थ सचिव