28 November 2020

News Flash

सेन्सेक्सचा ४४ हजाराला स्पर्श

प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर; बँक, वित्त समभागांना मागणी

(संग्रहित छायाचित्र)

आणखी एक कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस येण्याच्या वृत्ताने भांडवली बाजारातील उत्साही गुंतवणूकदारांनी नव्या संवत्सराच्या परिपूर्ण व्यवहाराला प्रमुख निर्देशांकांना पुन्हा विक्रमी शिखरावर नेऊन ठेवले. मंगळवारच्या व्यवहारात प्रथमच ४४ हजाराचा स्तर अनुभवणाऱ्या सेन्सेक्समध्ये सत्रअखेर त्रिशतकी अंशभर पडली. तर शतकी अंश वाढीने निफ्टी १३ हजारानजीक पोहोचला.

सत्रात ४४,१६१.१६ अंश झेप घेतल्यानंतर मंगळवारअखेर मुंबई निर्देशांक शनिवारच्या तुलनेत ३१४.७३ अंशांनी वाढून ४३,९५२.७१ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९३.९५ अंश भर पडून प्रमुख निर्देशांक १२,८७४.२० पर्यंत थांबला. दोन्ही निर्देशांक जवळपास पाऊण टक्क्य़ापर्यंत वाढले.

सलग चार व्यवहारानंतर सुरू झालेल्या भांडवली बाजाराचे मंगळवारचे सत्र तेजीत राहिले. संवत्सर २०७७ मधील परिपूर्ण व्यवहार यावेळी झाले. शनिवारी नव्या संवत्सराचे व्यवहार झाले होते. तर सोमवारी दीपावलीनिमित्त भांडवली बाजार बंद होता.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात मुंबई निर्देशांकाने ४२ हजार ते ४४ हजाराचा प्रवास केला आहे. तर गे्ल्या १० संवत्सरात प्रमुख निर्देशांक सरासरी ७.५ टक्क्य़ांहून अधिक वाढले आहेत.

अमेरिकास्थित मोडर्ना या जैवतंत्रज्ञान कंपनीने कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीतील यश ९४.५ टक्के असल्याचे जाहीर केल्याने जगभरातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये आशावादी वातावरण आहे. यापूर्वी फायझरनेही विकसित केलेल्या लशीच्या ९० टक्के परिणामकता जाहीर केली होती.

मंगळवारी सेन्सेक्समध्ये टाटा स्टील सर्वाधिक, ६.२४ टक्क्य़ांनी झेपावला. त्याचबरोबर स्टेट बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, एचडीएफसी लिमिटेड आदीही वाढले. तर एनटीपीसी, एचसीएल टेक, ओएनजीसी, इन्फोसिस, आयटीसी, पॉवरग्रिड, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदी जवळपास ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. बीपीसीएलमधील हिस्सा विक्रीसाठी बोली प्रक्रियेला प्रारंभातच प्रतिसाद मिळूनही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या समभागाचे मूल्य मात्र ४ टक्क्य़ांपर्यंत रोडावले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये औद्योगिक, पोलाद, भांडवली वस्तू, वित्त, बँक, स्थावर मालमत्ता वाढले. तर तेल व वायू, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा निर्देशांकांवर विक्री दबाव राहिला.

‘डिसेंबर २०२१ अखेर सेन्सेक्स ५० हजारावर’

नव्या संवत्सराचा तेजीसह प्रारंभ करणाऱ्या देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराचा सेन्सेक्स डिसेंबर २०२१ पर्यंत ५० हजारावर पोहोचेल, असा अंदाज मॉर्गन स्टॅनले या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने व्यक्त केला आहे. यापूर्वी, जून २०२१ पर्यंत मुंबई निर्देशांक ४० हजाराच्या आत असेल, असे भाकित वर्तविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:19 am

Web Title: sensex touches 44000 abn 97
Next Stories
1 लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध
2 … म्हणून एचडीएफसी बँक म्हणते, ‘मूह बंद रखो’
3 BPCL Privatisation: अनेक कंपन्या शर्यतीत; रिलायन्स,अरामकोची मात्र माघार
Just Now!
X