मुंबई : सलग तिसऱ्या व्यवहारात निर्देशांकात भर घालताना सेन्सेक्स व निफ्टी बुधवारी त्यांच्या महत्वाच्या टप्प्यापुढे गेले. १२५.३७ अंशवाढीने मुंबई निर्देशांक ३७,२७०.८२ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ३२.६५ अंशवाढीसह ११,०३५.७० पातळीवर स्थिरावला.

मोहरमनिमित्त भांडवली बाजारात मंगळवारी व्यवहार झाले नाहीत. तत्पूर्वी सोमवारीही प्रमुख निर्देशांकात वाढ नोंदली गेली होती. परिणामी सेन्सेक्सने ३७ हजार, तर निफ्टीने ११ हजारांपुढील स्तर राखला होता.

चीनने अमेरिकी आयात वस्तूंवरील शुल्क कमी करण्याचे संकेत दिल्याने उभय देशांदरम्यानचा व्यापारयुद्ध तणाव निवळल्याची प्रतिक्रिया आशियाई बाजारात बुधवारी निर्देशांक वाढीने नोंदविली.

पेटीएमच्या हिस्सा खरेदीने मूल्य तेजाळलेला येस बँकेचा समभाग सेन्सेक्समधील तेजीत अव्वल राहिला. त्याचबरोबर टाटा स्टील, वेदांता, इंडसइंड बँक, स्टेट बँक, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो यांचे मूल्य थेट १० टक्क्यांपर्यंत वाढले.

ओएनजीसी, एचसीएल टेक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, टेक महिंद्र, इन्फोसिस आदी मात्र ३ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदविणारे समभाग ठरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, वाहन, पोलाद, बँक, वित्त, दूरसंचार आदी ४.४५ टक्क्यांपर्यंत वाढले, तर माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू आदी निर्देशांक १.२९ टक्क्यांपर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक १.४३ टक्क्यांपर्यंत वाढले.

येस बँक समभागात १४  टक्क्य़ांची उसळी

पेटीएमद्वारे खासगी बँकेचे सहसंस्थापक व प्रवर्तक राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयांचा सर्व हिस्सा खरेदी केला जाण्याच्या चर्चेनंतर येस बँकेचा समभाग बुधवारी १४.४७ टक्क्यांपर्यंत उंचावला. सत्रअखेर बँकेच्या समभागाचे मूल्य ७१.६० रुपयांवर स्थिरावले. व्यवहारादरम्यान येस बँक समभाग मुंबई शेअर बाजारात ७२.५५ रुपयांवर झेपावला होता. दिवसअखेर बँकेचे बाजार भांडवल सोमवारच्या तुलनेत २,१६८.२२ कोटी रुपयांनी वाढत १८,२६०.२२ कोटी रुपयांवर पोहोचले. निफ्टी दरबारीही बँक समभाग मूल्यात जवळपास १३ टक्के भर पडली. तेथेही येस बँक प्रति समभाग ७२ रुपयांपुढील प्रवास करणारा समभाग ठरला.