सेन्सेक्स, निफ्टीची आठवडय़ात पहिल्या वाढीची नोंद

मुंबई : भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गेल्या सलग चार व्यवहारातील घसरण थांबवताना आठवडय़ातील पहिली सत्रतेजी शुक्रवारी नोंदवली. सप्ताहअखेरच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या तुलनेत जवळपास पाव टक्क्य़ाहून अधिक प्रमाणात वाढले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६६.०७ अंश वाढीसह ५२,४८४.६७ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४२.२० अंश वाढीने १५,७२२.२० पर्यंत पोहोचला. सप्ताहात सेन्सेक्सने ४४०.३७ अंश तर निफ्टीने १३८.१५ अंशांचे नुकसान सोसले आहे. टक्केवारीत हे प्रमाण प्रत्येकी जवळपास एक टक्क्य़ाचे आहे.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी १६ कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले. तर १४ कंपन्या घसरणीच्या यादीत राहिल्या. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, स्टेट बँक, टायटन कंपनी, एचडीएफसी लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस यांची खरेदी झाली. तर टाटा स्टील, पॉवरग्रिड, बजाज ऑटो, एशियन पेंट्स आदी घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, आरोग्यनिगा, दूरसंचार, स्थावर मालमत्ता, बँक, वित्त आदी अधिकतर निर्देशांक १.२३ टक्क्य़ांपर्यंत वाढले. या उलट पोलाद, बहुपयोगी वस्तू, भांडवली वस्तू निर्देशांक काही प्रमाणात घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप एक टक्क्य़ापर्यंत वाढले.