News Flash

वायदापूर्तीला निर्देशांक पुन्हा उच्चांकी

व्यवहारात सेन्सेक्स ३९,९११.९२ पर्यंत, तर निफ्टी ११,९६८.५५ अंशांपर्यंत उंचावला.

विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीचा विक्रमी ओघ

मुंबई : महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार करताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक गुरुवारी पुन्हा नव्या शिखरावर पोहोचले. एकाच व्यवहारातील तब्बल ३२९.९२ अंशांच्या उसळीसह सेन्सेक्स थेट ३९,८३१.९७ वर पोहोचला. तर ८४.८० अंश वाढीसह निफ्टी ११,९४५.९० पर्यंत स्थिरावला. या रूपात भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी त्यांचे एक दिवसापूर्वीचे विक्रम मागे टाकले.

भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार झाले. त्याचबरोबर गुरुवारी सायंकाळी पार पडणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात खरेदीचा जोर लावला.

मुंबई निर्देशांकातील रिलायन्स, एचडीएफसी, टीसीएससारख्या आघाडीच्या कंपन्यांनी सेन्सेक्सला गुरुवारी वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले. त्याचबरोबर एनटीपीसी, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टीसीएस, येस बँक, एचडीएफसी, स्टेट बँक आदींचे मूल्य २ टक्क्यांपर्यंत वाढले. या स्थितीतही सन फार्मा, महिंद्र अँड महिंद्र, इंडसइंड बँक, वेदांता, ओएनजीसी आदी २.३९ टक्क्यांपर्यंत घसरले.

व्यवहारात सेन्सेक्स ३९,९११.९२ पर्यंत, तर निफ्टी ११,९६८.५५ अंशांपर्यंत उंचावला. चालू आठवडय़ाची तेजीसह सुरुवात करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सोमवारी सर्वप्रथम ३९,७४९.७३, तर निफ्टीने ११,९४२.२० हा स्तर सर्वप्रथम अनुभवला होता. बुधवारच्या जवळपास एक टक्क्याच्या निर्देशांक वाढीने सेन्सेक्स तसेच निफ्टीने त्याचा सोमवारचा बंदअखेरचा टप्पा मागे टाकत बुधवारी नवा स्तर गाठला.

मुंबई निर्देशांकातील ऊर्जा, बहुपयोगी, दूरसंचार, ऊर्जा, वित्त, बँक क्षेत्र १.५८ टक्क्यांपर्यंत वाढले. तर पोलाद, स्थावर मालमत्ता निर्देशांकांमध्ये किरकोळ प्रमाणात घसरण नोंदली गेली. मुंबई निर्देशांकातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक ०.४० टक्क्यांपर्यंत वाढले.

परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत काही प्रमाणात घसरलेल्या रुपयाचे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या खनिज तेलाच्या किमतीकडे बाजारातील व्यवहारादरम्यान गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले.

‘पी-नोट्स’द्वारे विदेशी गुंतवणूक  ८१,२२० कोटींवर

*  विदेशी गुंतवणूकदारांमार्फत भांडवली बाजारात होणारी गुंतवणूक एप्रिल २०१९ अखेर ८१,२२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

‘पी-नोट्स’द्वारे विदेशी गुंतवणूकदार नोंदणी केल्याविनाच भांडवली बाजारात गुंतवणूक करत असतात. समभाग, रोखे तसेच वायदा स्वरूपातील ही गुंतवणूक असते.

सेबीने गुरुवारी जाहीर केलेल्या याबाबतच्या कलानुसार भांडवली बाजारातील तेजी विदेशी गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडल्याचे दिसते.

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात गेल्या महिन्यात केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी ५८,८२० कोटी रुपये हे समभागांमध्ये गुंतविले आहेत. तर २१,५४२ कोटी रुपये रोखे व १२३ कोटी रुपये वायदा बाजारात गुंतविले आहेत.

मार्चमधील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या तुलनेत ‘पी-नोट्स’द्वारे झालेली गुंतवणूक यंदा ३.९८ टक्क्यांनी वाढली असून २०१८-१९ या वित्त वर्षांच्या अखेरच्या महिन्यात ती ७८,११० कोटी रुपये होती.

देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या हंगामात केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार पुन्हा येण्याच्या आशेने भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूक वाढल्याचे मानले जाते. ‘पी-नोट्स’ माध्यमातून भांडवली बाजारात होणारी एप्रिल २०१७ पासून कमी होत होती. अनिवासी भारतीयांमार्फत वापरले जाणाऱ्या ‘पी-नोट्स’ माध्यमाबाबत सेबीने लागू केलेल्या नियमानंतर प्रामुख्याने हा निधीओघ आटला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 4:00 am

Web Title: sensex up 330 pts nifty ends at 11946
Next Stories
1 ‘सीकेपी बँके’ची सरकारकडूनच कोंडी
2 ‘आरटीजीएस’ व्यवहार आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत शक्य
3 स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांमध्ये भारत ४३ वा
Just Now!
X