भांडवली बाजारात मोठ्या अस्थिर व्यवहारांनंतर, मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने दिवसाला निरोप देताना आणखी ८४ अंशांची कमाई केली. करोना रुग्णसंख्येतील विक्रमी वाढ आणि त्याला अटकाव घालण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी लागू झालेले टाळेबंदीसारखे निर्बंध पाहता, गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसून येते.

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कोणतेही फेरबदल न करणाऱ्या, परंतु परिस्थितीजन्य लवचीकतेसह अर्थव्यवस्थेला प्रोत्साहनपर, एक लाख कोटी रुपयांच्या रोखे खरेदीच्या कार्यक्रमाच्या घोषणेने बुधवारी बाजारात मोठा उत्साह निर्माण केला होता. गुरुवारी बाजारात त्याच उत्साही जोमात व्यवहार सुरू झाले. मात्र नंतर बुधवारी मोठी कमाई करणाऱ्या बँका व वित्तीय सेवा कंपन्यांच्या समभागांमध्ये नफावसुली सुरू झाली. मात्र माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या दमदार खरेदीने पुन्हा संतुलन साधत, निर्देशांकांंच्या घसरणीला पायबंद घातला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर ८४.४५ अंश कमावून ४९,७४६.२१ या पातळीवर बंद झाला. तर अधिक व्यापक संख्येने प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकाने ५४.७५ अंशांच्या कमाईसह १४,८७३.८० वर दिवसाला निरोप दिला. टीसीएस, टेक महिंद्र, टायटन, अल्ट्राटेक सीमेंट, नेस्ले इंडिया, बजाज फिनसव्र्ह आणि लार्सन अँड टुब्रो या समभागांना मागणी मिळाली आणि त्यांनी सेन्सेक्सची सकारात्मक बाजू सांभाळून राखली. त्या उलट बुधवारच्या तेजीत वधारलेल्या इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या समभागांमध्ये गुंतवणूकदारांकडून गुरुवारी नफावसुली झाल्याचे दिसून आले.