जागतिक भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर येथील प्रमुख निर्देशांकांनी महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या व्यवहारापूर्वी ३ टक्क्यांहून अधिक उसळी एकाच व्यवहारात नोंदवली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रात थेट ९९५.९२ अंश वाढीसह ३१,६०५.२२ पर्यंत झेपावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी व्यवहारअखेर २८५.९० अंश वाढीने ९,३१४.९५ वर स्थिरावला.

मंगळवारच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांकांची वाढ अनुक्रमे ३.२५ व ३.१७ टक्के  अधिक राहिली. भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होणार आहेत.

जागतिक भांडवली बाजारातील तेजी लक्षात घेऊन विशेषत: विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी येथे समभाग खरेदीकरिता कल  दर्शवला. प्रामुख्याने बँक, वित्त, माहिती तंत्रज्ञान कं पन्यांना मागणी राहिली.

मुंबई निर्देशांक सत्रात ३१,६६०.६० अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक, तब्बल १३.४६ अंशांनी झेपावला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्सही वाढले. तर सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कं पनी, एशियन पेंट्सचे मूल्य जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक ७ टक्क्यांसह वित्त, माहिती तंत्रज्ञान, पोलाद, ऊर्जा निर्देशांकही वाढले. कोविडबाधितांची व मृत्युमुखींची संख्या वाढत असतानाच भांडवली बाजाराने तेजी राखली. त्याचबरोबर आरोग्यनिगा निर्देशांकांवर गुंतवणूकदारांचा विक्री दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात मंगळवारी ४,७१६.१३ कोटी रुपयांच्या मूल्यांची समभाग खरेदी केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात जपान, युरोपातील निर्देशांकांमध्ये वाढ होती, तर चीनसह आशियातील काही प्रमुख निर्देशांक घसरले होते. अमेरिकी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांची बुधवारच्या सत्राची सुरुवात तेजीसह कायम होती.

चीनमध्ये तांबे आणि पोलादाची मागणी वाढली

एलएमई बेस मेटलच्या किंमतीत सुधारणा दिसून येत असून अमेरिका – चीन दरम्यानच्या तणावाने निर्माण झालेल्या चिंतेने बाजारावर परिणाम नोंदला जात आहे. चीनची प्रोत्साहनपर योजना औद्योगिक धातूंची मागणी वाढण्यात मदत करत असून पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येत आहे. चीनमध्ये बेस मेटलची मागणी वाढल्याने चीनमधील धातूची आयात वाढली आहे. चीन धातूचा प्रमुख ग्राहक ठरत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.