आशियातील अव्वल भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सप्ताहारंभीच त्यांच्या सत्राच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाले. बँक तसेच देशातील आघाडीच्या समूहांच्या सूचिबद्ध कंपन्यांच्या मागणी जोरावर सेन्सेक्समध्ये सोमवारी शतकी निर्देशांक भर पडली, तर निफ्टी सत्रअखेर १०,८०० वर पोहोचला.

मुंबई निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत ९९.३६ अंशवाढीने ३६,६९३.६९ पर्यंत स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४.६५ अंश वाढ होऊन तो १०,८०२.७० वर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख सेन्सेक्स निर्देशांक व्यवहारात गेल्या सप्ताहअखेरच्या तुलनेत थेट ३३० अंशांनी उंचावला होता,

तर निफ्टी दुपारच्या सत्रातच १०,८०० पुढे गेला. दिवसअखेरही तेजी कायम राखताना दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी शुक्रवारच्या तुलनेत पाव टक्क्यांहून भर नोंदविली.

रिलायन्सचे बाजार भांडवल १२ लाख कोटींपुढे

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजमधील विदेशी गुंतवणूक वाढण्याचा कित्ता कायम आहे. क्वालकॉमने ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉम्र्समध्ये के ल्याने कं पनीचे समभाग मूल्य सोमवारी पुन्हा उसळले. सत्रात ३ टक्के वाढीसह कंपनीच्या समभागाने नवा मूल्य उच्चांक गाठला. परिणामी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल आता १२ लाख कोटी रुपयांपुढे गेले आहे. दुसऱ्या स्थानावरील टीसीएसदरम्यानची रिलायन्सची दरी जवळपास ६ लाख कोटी रुपयांची आहे.