गेल्या सलग सहा व्यवहारांपासून घसरणारा मुंबई शेअर बाजार गुरुवारच्या द्विशतकी निर्देशांक वाढीने त्याच्या तीन महिन्यांच्या तळातून बाहेर आला. २१६.२७ अंश वाढीने सेन्सेक्स २५,२५२.३२ वर पोहोचला, तर ७०.८० अंश वाढीमुळे निफ्टी ७,६८३.३० पर्यंत गेला. दोन्ही निर्देशांकाची सत्रातील कामगिरी ही १९ नोव्हेंबरनंतरची सर्वोत्तम ठरली.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची शुक्रवारी सुरू होणारी संभाव्य व्याजदर वाढीची बैठक आणि संसदेत रेंगाळलेले वस्तू व सेवा कर विधेयक असे चित्र असूनही बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा खरेदी ओघ राहिला. नोव्हेंबरमध्ये सरकारच्या अप्रत्यक्ष कर संकलनात झालेली वाढ निर्देशांकातील तेजीसाठी कारणीभूत ठरली.
सेन्सेक्समधील रिलायन्स हिंदाल्को, टाटा स्टीलसारख्या बडय़ा समभागांना राहिलेल्या मागणीने निर्देशांकात वाढ नोंदली गेली. २५,१३६.७१ या तेजीसह सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारात २५,२८९.५८ पर्यंत पोहोचला. सत्रातही ७,७०० पर्यंत पोहोचू न शकणारा निफ्टीही गुरुवारअखेर वाढला.
गेल्या सलग सहा व्यवहारांत घसरणाऱ्या मुंबई निर्देशांकांचे १,१३३.३६ हून अधिक नुकसान झाले आहे. यामुळे सेन्सेक्स बुधवारी २५ हजारांच्या काठावर विसावताना तीन महिन्यांच्या तळात विसावला होता. तर निफ्टीने ७,७०० चाही स्तर सोडला होता. सेन्सेक्स २५ हजारांपासून मोठय़ा प्रमाणात वर गेला असला तरी निफ्टीला ७,७०० चा टप्पा गुरुवारच्या तेजीनंतरही गाठता आला नाही.
मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक एक टक्क्यापर्यंत वाढले होते. सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य वाढले. त्यात एनटीपीसी, एचडीएफसी, बजाज ऑटो, सिप्ला, गेल, इन्फोसिस, आयटीसी हे आघाडीवर राहिले.

स्थावर मालमत्ता समभागांची मूल्यवृद्धी
स्थावर मालमत्ता नियमन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी उशिरा मंजुरी दिल्यानंतर गुरुवारच्या व्यवहारात या क्षेत्रातील समभागांचे मूल्य ५ टक्क्यांपर्यंत वाढले. स्थावर मालमत्ता क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सादर होत असलेल्या विधेयकामुळे क्षेत्रातील समभाग चर्चेत आल्याचे बोनान्झा पोर्टफोलियोचे अचिन गोयल म्हणाले.
० प्रेस्टिज इस्टेट्स रु. २१२.०० (+४.४३%)
० युनिटेक रु. ६.६६ (+३.२६%)
० एचडीआयएल रु. ६५.५० (+१.९५%)
० पूर्वाकुरा प्रोजेक्ट्स रु. ५९.७५ (+१.३६%)
० डीएलएफ रु. १११.६० (+०.९५%)