सेन्सेक्सची सात सप्ताहांतील सर्वात मोठी झेप

गेले काही दिवस पड खात असलेल्या बाजाराने गुरुवारी दमदार उभारी घेणारी झेप घेतली. दोन्ही निर्देशांक दोन महिन्यांपूर्वी मागे सोडलेल्या स्तरावर लोळण घेत असल्याचे दिसत असताना, जागतिक स्तरावर भांडवली बाजारात दिसलेला उत्साह त्यांना उधाण देणारा ठरला. दिवसात झालेल्या व्यवहारात सेन्सेक्सने ३५९ अंशांची उसळी घेतली, तर निफ्टीने १११ अंशांची कमाई करीत ७,८५० च्या उंबरठय़ापर्यंत मजल मारली.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हकडून येत्या डिसेंबरमध्ये बहुप्रतीक्षित व्याजदरात वाढीची घोषणा होईल या अपेक्षेने गेले काही दिवस स्थानिक बाजारात गुंतलेला पैसा पाय काढताना दिसत होता. बाजारातही त्या प्रमाणात घसरण या काळात दिसून आली, परंतु आधीच्या अमेरिकी फेडच्या बैठकीच्या खुल्या झालेल्या इतिवृत्तांतातून व्याजदर वाढीचा डिसेंबरचा मुहूर्तही टळण्याचे संकेत मिळत आहेत. वाढ झाली तरी ती नाममात्रच असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. व्याजाचे दर वाढवावेत असा अर्थव्यवस्थेत अपेक्षित सुधार नसल्याबाबत फेडच्या बैठकीचे मत बनले आहे, असा बैठकीचा इतिवृत्तांत सांगतो. या परिणामी स्थानिक बाजार सुरू होण्याआधी पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांनी प्रारंभीच मोठी झेप घेतल्याचे आढळून आले.
फेडचा बैठकीचा हा इतिवृत्तांत म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेबाबतचा अविश्वास ठरावच असून, व्याजदर वाढीबाबत आणखी काही काळ चर्चा नकोच, असे सुचविणारा असल्याचे विश्लेषकांनी मत व्यक्त केला. त्यामुळे भारतासह उभरत्या अर्थव्यवस्थांच्या बाजारात गुंतलेल्या विदेशी भांडवलाचे पलायनही लांबणार असल्याचे विश्लेषकांनी स्पष्ट केले. या शुभसूचक घडामोडीबरोबरच, भारतात मोदी सरकारची आर्थिक सुधारणा आघाडीवर गतिमानताही बाजाराला सुखावणारी ठरली. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्यातीला प्रोत्साहनपर ३ टक्के व्याजदर अनुदान, सरकारी कंपन्यांतील निर्गुतवणुकीचा निर्णय, खोळंबलेल्या महामार्ग प्रकल्पातील अडचणी दूर करण्याची पावले वगैरे निर्णयांचे गुरुवारी बाजारात सकारात्मक पडसाद उमटताना दिसले.
आरोग्यनिगा निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रनिहाय निर्देशांक दणदणीत वधारले. मधल्या फळीतील समभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांनीही अनुक्रमे १.२ टक्के व १.३ टक्के अशी कमाई करून गुरुवारची बाजाराची उभारी ही सर्वव्यापी असल्याचे दाखवून दिले.