३३४ अंशांच्या घसरणीने सेन्सेक्स ३९ हजाराखाली

मुंबई : गेल्या आठवडय़ात कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांवर तेजीवर झुलणारा भांडवली बाजार चालू सप्ताहारंभी मात्र इन्फोसिसच्या संशयास्पद ताळेबंदाच्या चर्चेने निर्देशांक घसरणीला सामोरे गेला. परिणामी सलग सहा व्यवहारातील सेन्सेक्स वाढीला खीळ बसताना मुंबई निर्देशांक मंगळवारी ३९ हजाराच्याही खाली आला.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमुळे सोमवारी भांडवली बाजारात व्यवहार झाले नाहीत. त्यामुळे चालू सप्ताहाच्या व्यवहाराची सुरुवात खऱ्या अर्थाने मंगळवारपासूनच झाली. गेल्या आठवडय़ात, यापूर्वीच्या सलग सहा व्यवहारात प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदविली होती.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ३३४.५४ अंश घसरणीसह ३८,९६३.८४ पर्यंत आला. तर ७३.५० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११,५८८.३५ वर येऊन ठेपला. दोन्ही निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत पाऊण टक्क्यापर्यंत खाली आले.

सेन्सेक्समध्ये मूल्य घसरण नोंदविणाऱ्या अन्य समभागांमध्ये टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक, बजाज फायनान्स यांचा क्रम राहिला. तर आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, बजाज ऑटो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी लिमिटेड आदी ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

इन्फोसिसमुळे एकूणच माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाला ७ टक्केपर्यंत घसरणीला सामोरे जावे लागले. तर दूरसंचार, पोलाद, वाहन क्षेत्रीय निर्देशांकालाही घसरण फटका बसला. आरोग्यनिगा, ग्राहकपयोगी वस्तू, बँक, वित्त, तेल व वायू, स्थावर मालमत्ता आदी मात्र २ टक्क्यांपर्यंत वाढले.

बीएसई मिड कॅप ०.०९ टक्क्याने घसरला. तर स्मॉल कॅप ०.४८ टक्क्यापर्यंत वाढला.

 लक्षणीय समभागमूल्य हालचाल..

इन्फोसिस :१७ टक्के घसरण

ल्ल माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील निष्कर्षांबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्याने संचालक मंडळाला पत्र लिहून उपस्थित केलेल्या शंकेचे तीव्र पडसाद मंगळवारी कंपनीच्या समभागावर उमटले. १७ टक्के घसरणीसह इन्फोसिस व्यवहारात त्याच्या गेल्या सहा वर्षांच्या मूल्यतळात पोहोचला होता.

महाबँक : १४ टक्के झेप

ल्ल दुसऱ्या तिमाहीत चौपट नफा वाढ नोंदविणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या समभाग मूल्यात मंगळवारअखेर १४ टक्केपर्यंत झेप नोंदली गेली. व्यवहारात बँक समभाग १८ टक्क्यांपर्यंत झेपावला होता. दिवसअखेर तो १३.३३ टक्के वाढीसह ११.०५ रुपयांवर स्थिरावला.