व्यवहाराच्या सलग दुसऱ्या दिवशी घसरताना प्रमुख निर्देशांक सप्ताहारंभीच गेल्या दहा दिवसाच्या तळात पोहोचले. वधारत्या कच्च्या तेलाच्या दरातील पाच महिन्यांच्या उच्चांकी महागाईची भर आणि भारतीय रुपयाचा डॉलरसमोरचा ६० च्या खालील प्रवास यामुळे सेन्सेक्ससह निफ्टीने सोमवारी घसरण नोंदविली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७.६९ अंश घसरणीसह २५,१९०.४० वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८.५५ अंश घसरणीमुळे ७,५३३.५५ वर बंद झाला. २५,२०० च्या खाली येणाऱ्या सेन्सेक्सची ५ जूननंतरची ही किमान पातळी होती. तेव्हा प्रमुख मुंबई निर्देशांक २५,०१९.५१ वर होता.
एकूण मागणीपैकी तब्बल ८० टक्के तेल आयातीवर निर्भर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेतही नऊ महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाची धास्ती पहायला मिळाली. त्यातच मेमधील १० टक्क्यांनजीकच्या घाऊक किंमत निर्देशांकही भांडवली बाजाराच्या घसरणीचे निमित्त बनला. वधारत्या डॉलरने आयटी निर्देशांक मात्र दीड टक्क्यांची वाढ राखता झाला.
मुंबई शेअर बाजारात भांडवली वस्तू, वाहन, बँक समभागांना नुकसान सोसावे लागले. तर बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोग वस्तू निर्देशांकांमध्ये उठाव दिसून आला. सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रिज, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अ‍ॅण्ड मिहंद्र, भारतीय स्टेट बँक, मारुती सुझुकी यांच्या समभागांची विक्री झाली.