नवी दिल्ली : देशाची निर्यात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली आहे. यंदाच्या सप्टेंबरमध्ये निर्यात ६.५७ टक्क्यांनी कमी होत २६ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे. पेट्रोलियम पदार्थ, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने व दागिने तसेच चामडय़ाची उत्पादने यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी मागणी नोंदली गेल्याने प्रामुख्याने निर्यातीत वार्षिक तुलनेत घसरण झाली आहे.

देशाची आयात गेल्या महिन्यात १३.८५ टक्क्यांनी कमी होत ३६.८९ अब्ज डॉलर झाली आहे. परिणामी निर्यात-आयातीतील दरी असलेली व्यापार तूट १०.८६ अब्ज डॉलपर्यंत स्थिरावली आहे. व्यापार तुटीचा हा गेल्या सात महिन्यातील तळ आहे.

रत्ने व दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि पेट्रोलियम पदार्थ यांच्या निर्यातीत गेल्या महिन्यात अनुक्रमे ५.५६ टक्के, ६.२ टक्के व १८.६ टक्के घसरण नोंदली गेली.

आयात वस्तूंमध्ये गेल्या महिन्यात सोन्याची आयात ६२.४९ टक्क्यांनी कमी होऊन १.३६ अब्ज डॉलर झाली आहे. तर तेल आयात १८.३३ टक्क्यांनी घसरून ८.९८ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

प्रमुख ३० क्षेत्रापैकी २२ क्षेत्राने सप्टेंबर २०१९ मध्ये नकारात्मक कामगिरी नोंदविली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या चालू अर्ध वित्त वर्षांत निर्यात २.३९ टक्के घसरून १५९.५७ अब्ज डॉलर तर आयात ७ टक्के घसरणीसह २४३.२८ अब्ज डॉलर झाली आहे.

सेवा क्षेत्र निर्यात, आयातीत वाढ

देशाच्या सेवा क्षेत्रातील निर्यात तसेच आयातीत यंदाच्या ऑगस्टमध्ये वाढ झाली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये देशाची सेवा क्षेत्राची निर्यात १८.२४ अब्ज डॉलर झाली असून त्यात वार्षिक तुनलेत १०.४ टक्के वाढ झाली आहे. तर ऑगस्टमधील आयात १६ टक्क्यांनी वाढून १२ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१८ मध्ये निर्यात व आयात अनुक्रमे १६.५३ अब्ज डॉलर व १०.३५ अब्ड डॉलर होती.