अन्नधान्य, इंधनाच्या किमतींनी निर्देशांकात वाढ

नवी दिल्ली : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर यंदाच्या सप्टेंबरमध्ये काहीसा उंचावत ५.१३ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. आधीच्या महिन्यातील ४.५३ टक्क्य़ांच्या तुलनेतील यंदाचा दर हा गेल्या दोन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावरचा आहे.

अन्नधान्याच्या तसेच इंधनाच्या किंमतीतील वाढीमुळे यंदा घाऊक महागाई दर वाढला आहे. वर्षभरापूर्वी, सप्टेंबर २०१७ मध्ये हा निर्देशांक ३.१४ टक्के होता. वार्षिक तुलनेतही यंदा तो वाढला आहे.

गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर किरकोळ वधारल्याचे गेल्या आठवडय़ात स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तिमाहीच्या तळात विसावल्याचेही यापूर्वीच जाहीर झाले आहे.

अन्नधान्याच्या महागाईचा दर यंदा ०.२१ टक्के राहिला आहे. तर या गटात भाज्यांच्या किंमती ३.८३ टक्क्य़ांवर आहेत. इंधनाच्या किंमती १६.६५ टक्के नोंदल्या गेल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान महागाईचा दर ३.९ ते ४.५ टक्के राहण्याचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केला आहे.

ऑगस्टच्या मध्यापासून सातत्याने वाढणाऱ्या इंधनदरानंतर ५ ऑक्टोबर रोजी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्याचबरोबर तेल व वायू विक्री व विपणन कंपन्यांनीही इंधनाचे दर लिटरमागे काही प्रमाणात कमी केले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधानकारक पातळीसमीप यंदाचा महागाई दर आहे. वाढत्या खनिज तेलाच्या किंमतींमुळे नजीकच्या भविष्यात महागाई वाढण्याची भिती मध्यवर्ती बँकेने व्यक्त केली आहे. व्याजदर वाढीची दाट शक्यताही असूनही तसे घडले नव्हते. मात्र डिसेंबरमधील पाचव्या द्विमासिक पतधोरणात थेट अर्ध्या टक्क्य़ापर्यंतची रेपो दरवाढ केली जाण्याची अर्थतज्ज्ञ, बाजार विश्लेषकांची अटकळ आहे.

तज्ज्ञ म्हणतात..

गेल्या काही सत्रांपासून इंधनांच्या किंमतींमध्ये प्रचंड हालचाल नोंदली जात आहे. इंधनावरील उत्पादन शुल्क तसेच मूल्यवर्धित करातील कपातीमुळे इंधन दरांमध्येही काहीसा दिलासा आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयाचा काहीसा दबाव घाऊक महागाई निर्देशांकामध्ये चालू महिन्यात जाणवण्याची शक्यता आहे.

– अदिती नायर, प्रधान अर्थतज्ज्ञ, इक्रा.

गेल्या सलग पाच महिन्यांमध्ये घाऊक किंमत निर्देशांक हा कायम ४ टक्क्य़ांवरच राहिला आहे. यंदाही तो जवळपास तेवढाच आहे. अर्थव्यवस्थील मागणी अद्यापही कायम असल्याचे यावरून जाणवते. कृषीमालाच्या किमान आधारभूत किंमती आणि खरिप पिकांचे उत्पादन यामुळे महागाईवर निर्माण होणारा दबाव येत्या कालावधीत पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

– डी. के. पंत, मुख्य अर्थतज्ज्ञ,  इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च.