अर्थव्यवस्थेच्या प्रवासाबाबत चिंता व्यक्त करणारा देशातील सेवा क्षेत्राचा प्रवास राहिला आहे. मेमध्ये या क्षेत्राने ५१ टक्के नोंद केली असून ती गेल्या सहा महिन्यांतील किमान ठरली आहे.
देशातील सेवा क्षेत्राची मोजमाप करणारा निक्केई/ मार्किट सेवा व्यवसाय कृती निर्देशांक आहे. तो ५० टक्क्यांपेक्षा खाली गेल्यास सेवा क्षेत्राबाबत गंभीर परिस्थिती असल्याचे मानले जाते.
निक्केईच्या खरेदी व्यवस्थापक निर्देशांकांनुसार (पीएमआय) सेवा तसेच निर्मिती क्षेत्राचे प्रमाणही मेमध्ये ५०.९ टक्के राहिले आहे. एप्रिलमध्ये ते ५२.८ टक्के तर केवळ सेवा क्षेत्राचे प्रमाण एप्रिलमध्ये ५३.७ टक्के नोंदले गेले आहे. ताजी आकडेवारी सरकारच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलिआना डि लिमा यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या मेमधील निर्मिती क्षेत्रानेही पाच महिन्यांचा तळप्रवास नोंदविला होता. एकूणच या परिस्थितीमुळे आता उद्योगातून रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा अधिक वाढली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या आठवडय़ात जाहीर होणार आहे. अपेक्षित मान्सूननंतरच दर कपात होईल, असाही एक सूर अर्थतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.