जुलैमधील निर्देशांक ५१.९ टक्क्यांवर

देशातील सेवा क्षेत्राने जुलैमध्ये गत तीन महिन्यांच्या तुलनेत सरस कामगिरी साधली आहे. मागणी कमी असली तरी सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये व्यावसायिक हालचाली वाढल्या असल्याचे निरीक्षण यानिमित्ताने नोंदविले गेले आहे.

निक्केई इंडिया सेवा व्यवसाय निर्देशांक (मार्किट) जुलैमध्ये ५१.९ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या, जूनमध्ये तो ५०.३ टक्के होता. निर्देशांकाचा ५० टक्क्यांखालील स्तर हा क्षेत्राचा प्रवास सुमार गृहीत धरला जातो. जुलैच्या समाधानकारक सेवा क्षेत्राच्या कामगिरीने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीची सुरुवात सकारात्मक झाल्याचे मानायला हरकत नाही, असे मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलयान्ना डे लिमा यांनी म्हटले आहे. सेवा क्षेत्राची मागणी वाढल्याचे हा निर्देशांक वर्तवितो, असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरील महागाई व रोजगाराबाबतची स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गेल्या महिन्यातील निर्मिती क्षेत्रानेही वाढ नोंदविताना ५१.८ टक्के निर्देशांक नोंदविला होता. उत्पादित वस्तूंना असलेली मागणी उंचावल्याने देशातील निर्मिती क्षेत्राची वाढ गेल्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या निक्केई मार्किट इंडिया निर्मिती व्यवस्थापकांच्या निर्देशांकांनुसार (पीएमआय) तो जूनमध्ये ५१.७ टक्के होता.

रोजगार तसेच महागाईच्या स्थितीत गेल्या काही महिन्यांमध्ये फारसा फरक पडला नसल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला येत्या ९ ऑगस्ट रोजीच्या पतधोरणात व्याजदर कमी करण्यास खूपच कमी संधी असल्याचे मानले जात आहे. मान्सूननंतर अर्थस्थिती लक्षात घेऊन नजीकच्या भविष्यात व्याजदर बदलाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञ, दलाल पेढय़ा, बँकप्रमुखांनी व्यक्त केली आहे.