फेब्रुवारीतील निर्देशांक सुधारून ५० गुणांपुढे! निश्चलनीकरणामुळे आलेली मरगळ संपुष्टात

निश्चलनीकरणापूर्वीच्या पातळीनजीक पोहोचताना देशातील सेवा क्षेत्राचा प्रवास तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा तेजीत नोंदला गेला आहे. गेल्या महिन्यात सेवा क्षेत्राची वाढ समाधानकारक ५०च्या पुढे, ५०.३ पर्यंत गेली आहे.

सेवा क्षेत्राचा दर यापूर्वी ऑक्टोबर २०१६ मध्ये ५४.५ होता. त्यानंतर त्यात पुढील दोन महिन्यांत कमालीचा उतार येत हा दर थेट ४६.७ वर येऊन ठेपला होता.

वर्षभरात सेवा क्षेत्र ऑगस्ट २०१६ मध्ये सर्वाधिक ५४.७ वर पोहोचले होते. तर नोव्हेंबरच्या रूपात ते प्रथमच ५०च्या खाली गेले होते. याच कालावधीत देशात निश्चलनकरणाची प्रक्रिया राबविली गेली. दरम्यानच्या दोन्ही महिन्यांत हा दर ४७ खालीच राहिला आहे.

निक्केई इंडिया सेवा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक हा वर्षांच्या सुरुवातीला, जानेवारी २०१७ मध्ये हा दर ४८.७ नोंदला गेला होता. नोव्हेंबरमधील दर गेल्या तीन वर्षांच्या तळात होता. या वेळी जून २०१६ नंतरची पहिली घसरण नोंदली गेली होती.

सलग दुसऱ्या महिन्यात सेवाक्षेत्रात वाढ झाल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्किटचे मुख्य अर्थतज्ज्ञ पोलीआा डी लिमा यांनी म्हटले आहे. पुढील काही महिने सेवाक्षेत्र स्थिर प्रवास करेल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर वर्षभराचा अंदाज व्यक्त करण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.

सकल राष्ट्रीय उत्पादन वाढल्याचे दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत हा दर अपेक्षेपेक्षा अधिक, ७.१ टक्के नोंदला गेला. वाढीव सेवाक्षेत्र निर्देशांक मात्र भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारात वाढ नोंदविण्यास असमर्थ ठरला.