करोनामुळे करावे लागलेल्या टाळेबंदीचा अपेक्षित फटका देशाच्या खासगी क्षेत्रातील सेवा क्षेत्राला बसला आहे. याबाबतचा मार्च २०२० मधील निर्देशांक ४९.३ अंश नोंदला गेला आहे.

आयएचएस मार्किट इंडिया सेवा व्यवसाय निर्देशांक यंदा एकूणच सेवा क्षेत्रातील हालचाल ठप्प पडल्याने समाधानकारक अशा ५० अंशांच्याही खाली आला आहे.

आधीच्या महिन्यात – फेब्रुवारीमध्ये हा निर्देशांक तब्बल ५७.५ अंश असा गेल्या थेट ८५ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर होता. या सर्वेक्षणासाठी १२ ते २७ मार्चमधील सेवा क्षेत्रातील हालचाल टिपली गेली आहे. देशात २७ मार्चपूर्वीच २१ दिवसांसाठी टाळेबंदी जाहीर झाली.

सेवा क्षेत्राच्या निर्देशांकासाठी अहवाल तयार करणाऱ्या आयएचएस मार्किटचे अर्थतज्ज्ञ जो हायेस यांनी मात्र, कोविड-१९ संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विपरित परिणाम अद्याप पूर्णपणे टिपला गेला नसल्याचे स्पष्ट केले.

सप्टेंबर २०१९ नंतर यंदा प्रथमच सेवा क्षेत्राचा निर्देशांक घसरला आहे. यंदा तर त्याने ५० अंशांची पातळीही सोडली. सेवा तसेच निर्मिती क्षेत्राचा एकूण निदेशांक गेल्या महिन्यात, मार्चमध्ये ५०.६ अंशांवर स्थिरावला आहे.