फेब्रुवारीमध्ये निर्देशांक ४८ अंश खाली

गेल्या महिन्यातील देशाचा सेवा क्षेत्राचा प्रवास सहा महिन्यांच्या तळात विसावला आहे. ग्राहकांकडून असलेल्या मागणीअभावी सेवा क्षेत्राची वाढ फेब्रुवारीमध्ये ४७.८ अंशपर्यंत घसरली आहे. वाढत्या महागाईने सेवा क्षेत्रातून मागणी रोडावल्याचे मानले जात आहे.

निक्केई इंडिया सेवा व्यवसाय कृती निर्देशांक आधीच्या, जानेवारी महिन्यात ५१.७ अंश नोंदला गेला होता. ५० नजीकचा निर्देशांक समाधानकारक मानला जातो. यंदाचा हा प्रवास ऑगस्ट २०१७ नंतरचा किमान नोंदला गेला आहे. तर गेल्या तीन महिन्यात त्यात लक्षणीय उतार अनुभवला गेला आहे.

नवीन मागणी आणि कृती या दोहोत नोव्हेंबर २०१७ नंतर प्रथमच सुमार प्रतिक्रिया राहिल्याने यंदा सेवा क्षेत्राचा निर्देशांक मोठय़ा फरकाने खाली आला असल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्किटच्या अर्थतज्ज्ञ आशना दोढिया यांनी म्हटले आहे.

कंपन्या, उद्योगांना सेवा क्षेत्राकडून येत्या कालावधीत अधिक आशा असल्याचे निरिक्षण सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर पुढील वर्षभरात रोजगारविषयक हालचालही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सेवा क्षेत्राचा निर्देशांक यंदाच्या फेब्रुवारीमध्ये घसरला असली तरी पुढील वर्षभरात त्यात वाढ अपेक्षित आहे. तसा विश्वास याबाबतच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. जून २०११ नंतर तो सर्वोत्तम असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

नवीन मागणी आणि कृती या दोहोत नोव्हेंबर २०१७ नंतर प्रथमच सुमार प्रतिक्रिया राहिल्याने यंदा सेवा क्षेत्राचा निर्देशांक मोठय़ा फरकाने खाली आला आहे.

आशना दोढिया, आयएचएस मार्किटच्या अर्थतज्ज्ञ.