गेल्या सप्ताहात २३ हजारानजीक पोहोचलेल्या भांडवली बाजारात नफा कमाविण्याचा गुंतवणूकदारांचा उद्देश सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला. सेन्सेक्समध्ये मंगळवारी १६५.४२ अंशांची घट होत निर्देशांक २२,४६६.१९ पर्यंत खाली आला. निफ्टीत ४६ अंश घसरण होऊन ६,७१५.२५ वर येऊन ठेपला.
सलग तिन्ही सत्रांतील मुंबई निर्देशांकातील घट आता ४१०.३५ अंशांची झाली आहे. यामुळे सेन्सेक्स २२,५०० च्याही आत विसावला आहे. नकारात्मक घडामोडींमुळे चिंता व्यक्त करतानाच गुंतवणूकदारांनी बाजारात नफेखोरीही अनुसरली आहे.
मंगळवारी बाजारात अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरणाचाही दबाव दिसून आला. आणखी मासिक १० अब्ज डॉलरची रोखे खरेदीचा निर्णय मंगळवारी उशिरापासून सुरू होणाऱ्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीत होणार आहे. अमेरिकी अर्थव्यवस्था सावरत असल्याने यापूर्वीही रोखे खरेदी आवरती घेतली आहे.
भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी संपूर्ण एप्रिलमध्ये सर्वात कमी खरेदी नोंदविली आहे. तर शनिवार, रविवारसह अतिरिक्त चार बंद व्यवहार सत्रांमुळे महिन्यात स्थानिक गुंतवणूकदारांनी केवळ दोनच दिवस खरेदी अनुभवली आहे. गुंतवणूकदारांची नजर आता १६ मेच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागली आहे.
मंगळवारच्या व्यवहारात पोलाद, बँक, वाहन, ऊर्जा क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. १२ पैकी केवळ ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वधारणेच्या यादीत राहिला. सर्वाधिक फटका पोलाद निर्देशांकाला, २.६९ टक्के घसरणीचा बसला. सेन्सेक्समधील २५ कंपनी समभाग घसरले. हिंदूुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, टाटा स्टील, सेल, जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर यांचे समभाग मूल्य रोडावले.