निफ्टी ७५०० पार; सेन्सेक्स २४,८०० नजीक
मुंबई शेअर बाजारातील तेजी सलग सहाव्या व्यवहारातही कायम राहिली. बुधवारच्या १३४.७३ अंशवाढीने सेन्सेक्सला २४,७९३.९६ पर्यंत मजल मारता आली, तर ४६.५० अंश भर नोंदवीत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही विनासाय ७,५०० पार होताना ७,५३१.८० पर्यंत पोहोचला. सेन्सेक्स आता गेल्या सव्वा महिन्याच्या वरच्या टप्प्यावर आहे. मुंबई निर्देशांकाचा यापूर्वीचा सर्वोच्च स्तर १ फेब्रुवारी रोजी २४,८२४.८३ होता.
गेल्या काही सत्रांपासून बाजाराची तेजी रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशेवर आहे. येत्या महिन्यात जाहीर होणाऱ्या पतधोरणात गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे किमान पाव टक्क्य़ाची दर कपात करतील, या विश्वासावर गुंतवणूकदारांनी खरेदीचे सत्र कायम ठेवले. आशियाई बाजारात नरमाई असूनही येथे मात्र सत्रअखेरही तेजी नोंदली गेली. गेल्या सहा व्यवहारांतील तेजी १,७९१.९६ अंशांची झाली आहे.
सेन्सेक्सची बुधवारची सुरुवात काहीशी नरम झाली. युरोपीय बाजारातील सुरुवातीच्या तेजीवर मात्र बाजारात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारच्या व्यवहारात ७,५०० चा स्तर ओलांडणाऱ्या निफ्टीचा प्रवास सत्रात ७,५३९ पर्यंत झेपावला होता, तर त्याचा व्यवहारातील तळ ७,४२४.३० राहिला.
सेन्सेक्समधील ३० पैकी १० समभागांचे मूल्य वाढले. यातही मारुती सुझुकी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, ओएनजीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, भेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, अ‍ॅक्सिस बँक, इन्फोसिस आघाडीवर राहिले, तर एचडीएफसी, कोल इंडिया, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स असे १० समभाग घसरणीच्या यादीत राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू सर्वाधिक १.६३ टक्क्य़ांनी वाढला. सोबतच स्थावर मालमत्ता, ऊर्जा, वाहन हेही १.५१ टक्क्य़ांपर्यंत विस्तारले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप अनुक्रमे ०.९४ व ०.०४ टक्क्य़ाने वाढले.

रुपया १४ पैशांनी भक्कम
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी १४ पैशांनी उंचावत ६७.२१ पर्यंत पोहोचला. चलनाची सुरुवात सकाळच्या व्यवहारात ६७.४५ या किमान स्तरावर सुरू झाली होती. लगेचच तो व्यवहारा दरम्यान ६७.५१ पर्यंतही घसरला. दिवसअखेर मात्र चलन मंगळवारच्या तुलनेत भक्कम बनले. सत्रा दरम्यान ६७.१७ पर्यंत रुपया वाढला. बुधवारअखेरची त्यातील वाढ ०.२१ टक्के राहिली.