सुमारे ५,६०० कोटी रुपयांच्या एनएसईएल (नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड) घोटाळा प्रकरणात आणखी सात जणांना सोमवारी अटक करण्यात आली. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास विभागाने ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एआरके इम्पोर्ट्सचे संचालक कैलाश अगरवाल, नेट कोअर अलायन्सचे संचालक प्रशांत बोरोट, एनसीएस शुगरचे संचालक  एन. नागेश्वर रे, जुगेरनट प्रोजेक्सचे बी. व्ही. एच. प्रसाद, स्पिन कॉटन टेक्सटाईलचे संचालक जी. राव, विमलादेवी अॅग्रोटेकचे वरुण गुप्ता आणि चंद्रमोहन सुंघल यांचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांची रक्कम परत फेडण्यात अपयश आलेल्यांची ही नावे असून या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी वर्तविली. विभागाने या प्रकरणात गेल्याच आठवडय़ात मुख्य प्रवर्तक फायनान्शिअल टेक्नॉलॉजिजचे संस्थापक जिग्नेश शहा यांच्यावर तब्बल ९,३६० पानांचे आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात नाव असणाऱ्यांमध्ये शहा हे सहावे व्यक्ती आहेत. याच प्रकरणात तपास विभागाने ३२२ बँक खातही गोठविली असून त्या खात्यांमध्ये १७१ कोटी रुपये आहेत. तर २१० मालमत्ता तसेच ५.८ कोटी रुपये मूल्य असलेल्या १५ कारही जप्त करण्यात आल्या आहेत.