महाराष्ट्रस्थित सात बिगरबँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) यांनी व्यवसाय न करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र या सातही कंपन्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेला परत केले आहेत, तर अन्य चार बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांचे परवाने रिझव्‍‌र्ह बँकेने स्वत:हून रद्द केले आहे.
यापुढे वित्तीय व्यवसाय न करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेकडे इच्छा प्रदर्शित करणाऱ्या सातपैकी सहा बिगरबँक वित्त कंपन्या या मुंबईतील असून एक पुण्यातील आहे. व्ही. एच. दोशी अ‍ॅण्ड सन्स इन्व्हेस्टमेंट, विनोदचंद्र दोशी इन्व्हेस्टमेंट, समर्थ दोशी इन्व्हेस्टमेंट, एकजय ओव्हरसीज ट्रेड्स, हरी महाविन इन्व्हेस्टमेंट, बरोडा इंडस्ट्रीज (सर्व मुंबईस्थित) व पुण्यातील युरेका फिनव्हेस्ट अशी त्यांची नावे आहेत. १९९८ ते २०१५ दरम्यान त्यांना परवाने देण्यात आले होते.
रिझव्‍‌र्ह बँकेने रद्द केलेल्या चार बिगरबँक वित्त कंपन्यांमध्ये मुंबई व पुण्यातील प्रत्येकी एका कंपनीचा समावेश आहे. १९९८ ते २००३ दरम्यान त्यांना परवाना देण्यात आला होता.
कोलकता येथील नीलांजली इंजिनीअरिंग व नोवोफ्लेक्स ट्रेडकॉम यांच्यासह गाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड ट्रेडिंग (मुंबई) व एनॉल व्हेंचर्स (पुणे) या कंपन्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.