हवालदिल कामगारांची ‘एनसीएलटी’कडे धाव

नवी दिल्ली : वाढत्या कर्जभाराखाली दबलेल्या व कुणीही खरेदीदार न मिळालेल्या आलोक इंडस्ट्रीजची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू झाली आहे. कंपनीला अवसायनात काढण्याच्या विरोधात आता कर्मचाऱ्यांनीच हालचाल सुरू केली आहे.

कंपनीच्या १२,००० कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद अर्थात ‘एनसीएलटी’कडे याबाबत धाव घेतली असून आलोक इंडस्ट्रीजला अवसायानात काढण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

आलोक इंडस्ट्रीजच्या खरेदीचा प्रयत्न यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने काही फंड कंपन्यांच्या सहकार्याने केला होता. मात्र त्यात तिला यश आले नाही. तसेच ही कंपनी खरेदी करण्यासाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

कंपनीच्या ‘आलोक एम्प्लॉइज बेनेफिट अ‍ॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट’ने अवसायन प्रक्रियेला आक्षेप घेतल्याचे आलोक इंडस्ट्रीजने भांडवली बाजाराला कळविले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ११ मे रोजी होणार आहे.

आलोक इंडस्ट्रीजकरिता नेमण्यात आलेल्या कर्जपुरवठादारांच्या समितीने रिलायन्स तसेच जेएम फायनान्शिअल असेट रिकंस्ट्रक्शन कंपनीची एकमेव संयुक्त निविदा गेल्या आठवडय़ात नाकारली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या अहमदाबाद खंडपीठाने कंपनीविरुद्धची नादारी प्रक्रिया जुलै २०१७ मध्ये दाखल करून घेतली होती.

रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत निश्चित केलेल्या १२ कर्जदार कंपन्यांमध्ये आलोक इंडस्ट्रीजचा समावेश आहे. स्टेट बँकेसह विविध बँकांचे २३,००० कोटी रुपयांचे कर्ज कंपनीवर आहे.