नवी मुंबई परिसरात सिडकोसारख्या शासन अंगिकृत उपक्रमाचा आधार घेत गृहनिर्माण क्षेत्रात बस्तान बसविलेल्या शहा ग्रुपवर सेबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेले ६.१६ कोटी रुपये वार्षिक १५ टक्के व्याजदराने वर्षभरात परत करण्याचे आदेश बाजार नियामकाने दिले आहेत. त्याचबरोबर प्रवर्तक नलीन व नीलम शहा दाम्पत्याला भांडवली बाजारातून येत्या दीड वर्षांसाठी निधी उभारणीसही मज्जाव केला आहे. सहारा चिट फंडाची पुनरावृत्ती शहा ग्रुपच्या माध्यमातून नवी मुंबईत झाल्याचे मानले जात आहे.
सेबी कारवाईबद्दल ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने पाठविलेल्या इ-मेलला या समूहाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सकृतदर्शनी लोकांकडून ठेवी रूपात मोठा निधी उभारण्याची शहा ग्रुप बिल्डर्स लि. (एसजीबीएल) ची कृती नियमबाह्य़ असल्याचे ठरविणारा आदेश सेबीने काढला आहे. या आदेशाची प्रत ‘सेबी’च्या संकेतस्थळावरही आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध असण्याच्या तयारीत असलेल्या शहा ग्रुपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाशी येथे मुख्यालय असलेल्या व नलीन विरजी व नीलम नलीन शहा दाम्पत्य मुख्य प्रवर्तक असलेल्या या समूहावर गैर मार्गाने पैसे गोळा केल्याचा बाजार नियामकांचा स्पष्ट ठपका आहे. हे प्रकरण सात वर्षांपूर्वीचे आहे. कंपनीने २८ जुलै २००८ ते ३० मार्च २०१२ दरम्यान १,५२२ जणांना २२.५० कोटींचे समभाग जारी केले होते. यापूर्वीही अवघ्या दोन महिन्यात कंपनीने ४९ जणांना समभाग विकले होते. या साऱ्या प्रक्रियेत अनियमितता असल्याचे सेबीच्या आदेशात म्हटले आहे.
त्यावर कारवाई म्हणून शहा ग्रुपला वर्षभरात १५ टक्के वार्षिक दराने ६.१६ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले आहे. तसेच परत करावयाच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम ही प्रत्येक तिमाहीला गुंतवणूकदारांना देण्यास सेबीने सांगितले आहे. आतापर्यंत ३.६ कोटी रुपये दिल्याचा दावा करणाऱ्या समूहाला सनदी लेखापालाद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा हवाला देण्यासही सांगण्यात आले आहे.

कोण आहेत शहा बिल्डर्स?
नवी मुंबईतील प्रसिद्ध विकासक समूह असलेल्या शहा ग्रुपचे नलिन शहा हे मुख्य प्रवर्तक आहेत. समूहात त्यांच्यासह त्यांची पत्नी नीलम शहा यादेखील संचालक आहेत. शिवाय पुत्र नीरव नलीन शहा हेही कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. नवी मुंबई परिसरात शहा समूहाचे अनेक गृहनिर्माण व व्यापारी प्रकल्प आहेत. ‘सील ऑफ ट्रस्ट’ बोधवाक्य असलेल्या ‘शहा ग्रुप बिल्डर्स अ‍ॅण्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड’चे सध्या चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते तसेच बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार यांच्याबरोबरच्या शहा कुटुंबीयांच्या सोहळ्यांना वेळोवेळी ‘प्रसिद्धी’चा झोतही मिळत आला आहे.