मध्यवर्ती संचालक मंडळाची आज बैठक

रिझव्‍‌र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास हे शुक्रवारच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या नियोजित बैठकीचे नेतृत्व करणार असून, त्यांच्या कार्यपद्धतीची ती पहिली कसोटी असेल. महिन्याभरात दुसऱ्यांदा होत असलेल्या या बैठकीत चर्चेत असलेल्या केंद्र सरकारशी मतभेदांच्या मुद्दय़ांवर नव्या गव्हर्नरांच्या भूमिकेचा या निमित्ताने कस लागणार आहे.

नोव्हेंबरच्या मध्याला झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळ बैठकीला नुकताच राजीनामा देणाऱ्या ऊर्जित पटेल यांनी संबोधित केले होते. तब्बल १० तास चाललेल्या या बैठकीनंतर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांकरिता घसघशीत रोकडविषयक सवलत देण्यात आली होती.

रिझव्‍‌र्ह बँकेची दुसरी बैठक तोंडावर आली असताना पटेल राजीनामा देऊन सरलेल्या सोमवारी पायउतार झाले. परिणामी शुक्रवारच्या बैठकीबाबतची अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र पटेल यांच्या राजीनाम्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दास यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यांनी लगेचच रिझव्‍‌र्ह बँकेचा कार्यभार हातीही घेतला. शुक्रवारच्या बैठक ठरल्याप्रमाणे होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण सरकारशी निकटता राखून, सल्लामसलतीने कार्य करू या दास यांच्या स्पष्टीकरणानंतर, संचालक मंडळानेही नि:श्वास सोडला आहे. शुक्रवारच्या बैठकीत १९ नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णयांचा आढावा घेतला जाणार असून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिकदृष्टय़ा कमकुवत बँकांसाठीचा त्वरित सुधारणा आराखडय़ाच्या पुनर्विचाराची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

व्यापारी बँकांच्या वाढत्या थकीत कर्जाबाबतही काही पावले या बैठकीत उचलली जाण्याची शक्यता आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे संचालक मंडळ हे सल्लागार तसेच निर्णयप्रमुख  महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये केंद्र सरकारनियुक्त दोन सदस्य आहेत. गव्हर्नरप्रमुख असलेल्या १८ सदस्यीय संचालक मंडळात ११ स्वतंत्र संचालकही आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरांनी खासगी बँकांच्या मालकी व नियमन आराखडय़ाबाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत भारतातील खासगी बँका या विदेशी प्रवर्तकांच्या हातात जाऊ देऊ नये. देशातील बँकिंग व्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वरचष्मा असला तरी काही खासगी बँकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेली खासगी गुंतवणूक चिंताजनक आहे.  – अश्विनी महाजन, सहसंघटक, स्वदेशी जागरण मंच.