25 February 2021

News Flash

निर्णय नव्हे, फक्त आढावा बैठक!

नव्या गव्हर्नरांची सावध पावले

रिझव्‍‌र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास

नव्या गव्हर्नरांची सावध पावले

सरकारी बँकांसाठी जाचक बनलेले ‘पीसीए’ र्निबधात अर्थात त्वरित सुधारात्मक कृती आराखडय़ात शिथिलता, गैरबँकिंग वित्त कंपन्यांना रोकड तरलता आदी अपेक्षित निर्णय टाळून केवळ सुशासन आराखडय़ाबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवत रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास शुक्रवारी संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीला सामोरे गेले.

ऊर्जित पटेल यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा सोमवारी राजीनामा दिल्यानंतर दास यांची नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांनी कार्यभारही स्वीकारला. गुरुवारच्या  बँकप्रमुखांच्या बैठकीत दास यांना थकीत कर्जात वाढीमुळे बँकांवर र्निबधात्मक लादण्यात आलेल्या ‘पीसीए’मध्ये शिथिलता आणण्याची विनंती केली गेली होती. तसेच आयएल अँड एफएसच्या थकीत कर्जहप्त्यामुळे अडचणीत आलेल्या गैरबँकिंग वित्त कंपन्यांना रोकड तरलता उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

दास यांनी शुक्रवारच्या बैठकीत या दोहोंबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. चार तास चाललेल्या १८ सदस्यीय संचालक मंडळाच्या बैठकीनंतर केवळ सुशासनाच्या आराखडय़ावर चर्चा करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राखीव निधीबाबतही चर्चा टाळली

मध्यवर्ती बँक व केंद्र सरकारमध्ये संघर्ष निर्माण करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेकडील राखीव निधीबाबतही शुक्रवारच्या बैठकीत काहीही निर्णय झाला नाही. तसेच नोव्हेंबरमधील बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयाचा आढावा घेण्याचेही टाळण्यात आले.

रिझव्‍‌र्ह बँकेकडे मोठा राखीव निधी असला तरी त्याचा विनियोग सरकारने वित्तीय तूट भरून काढण्याकरिता अथवा सरकारी खर्चाच्या पूर्ततेकरिता करणे योग्य नाही. ही रक्कम वित्तीय व्यवस्थेच्या स्थिरतेकरिता उपयोगात आणली जाणे अपेक्षित आहे. बचत ही सध्याच्या खर्चाकरिता नव्हे तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असावी, हे सर्वसाधारण आर्थिक तत्त्व आहे. रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर सरकारचे याबाबत खटके उडत असतील तर निधी गैर-खर्चासाठी वापरला जाणार नाही असा विश्वास देणारी समिती नेमली जावी.     – अरविंद सुब्रमणियन, माजी मुख्य आर्थिक सल्लागार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:06 am

Web Title: shaktikanta das rbi
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर रघुराम राजन यांचे मत काय?, जाणून घ्या
2 रिझव्‍‌र्ह बँकेशी मतभेदाची अर्थमंत्र्यांकडून कबुली
3 नवनियुक्त गव्हर्नरांची पहिली कसोटी
Just Now!
X