भांडवली बाजाराची चालू सप्ताहाची अखेर निर्देशांक घसरणीने झाली. परिणामी महिन्यातील नव्या वायदापूर्तीची सुरुवात निराशाजनक झाली. सेन्सेक्ससह निफ्टी गुरुवारच्या तुलनेत प्रत्येकी जवळपास दोन टक्क््यांपर्यंत आपटले.

सेन्सेक्स शुक्रवारी ९८३.५८ अंशांनी घसरून ४८,७८२.३६ वर थांबला. तर निफ्टी २६३.८० अंशांनी खाली येत १४,६३१ पर्यंत स्थिरावला. सप्ताहअखेरच्या मोठ्या घसरणीमुळे सेन्सेक्सने त्याचा ४९ हजाराचा स्तरही सोडला.

यामुळे भांडवली बाजाराची गेल्या सलग सत्रातील तेजी यामुळे थांबली. सप्ताहा दरम्यान मुंबई निर्देशांक ९०३.९१ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८९.७५ अंशांनी घसरला आहे.

कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षावर वाढीव नफ्यामुळे गेल्या सलग चार व्यवहारापासून तेजी नोंदवणाऱ्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमध्ये वाढत्या करोनाबाधित तसेच मृत्युमुखी संख्येबाबतची चिंता दिसून आली. गेल्या २४ तासात भारतात दिवसाला सर्वाधिक अशा ३.८६ लाख करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

मुंबई निर्देशांकातील प्रमुख ३० पैकी एचडीएफसी समूहातील एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँक यांचे मूल्य ४ टक्क््यांहून अधिक प्रमाणात खाली आले. तसेच आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, महिंद्र अँड महिंद्र, टीसीएस, हिंदुस्थान यूनिलिव्हर, मारुती सुझुकीलाही मूल्य घसरणीचा फटका बसला.

सेन्सेक्समधील ओएनजीसी, सन फार्मा, डॉ. रेड्डीज्, बजाज ऑटो यांचे समभाग मात्र ४ टक्क््यांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वित्त, बँक, वाहन २.७३ टक्क््यांपर्यंत घसरले. तर तेल व वायू, आरोग्यनिगा, पोलाद निर्देशांक वाढले.