मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने सध्या तरी दुष्काळाचे सावट दूर झाल्याने सुखावलेल्या गुंतवणूकदारांनी रोख्यांची मोठी खरेदी केली. याचा परिणाम म्हणून शुक्रवारी रोख्यांच्या किमतीत दिवसाच्या व्यवहारात मागील एका वर्षांतील सर्वाधिक वाढीची नोंद झाली.
शुक्रवारी सकाळी रोखे बाजाराच्या कामकाजाच्या सत्राला प्रारंभ होतानाच ‘फेड’च्या बठकीत अमेरिकेतील व्याजदर वाढविण्याचा निर्णय तात्पुरता रहित झाल्याच्या दिलाशाला पावसाच्या प्रारंभिक तीव्रतेने सुखकारक जोड दिली. या दोन्हींबाबत अनिश्चितता दूर सरल्याने बाजारातील उत्साहाला द्विगुणित केले. ‘फेड’च्या निर्णयावर लक्ष ठेवून असलेल्या निर्यातदारांनी मोठय़ा प्रमाणात डॉलरची विक्री केल्याचा परिणाम चलन बाजारातही दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया दमदार वधारला.
जुल २०२४ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांचा परताव्याचा दर दुपारी १ वाजता ७.९५ इतका होता. आधीच्या दिवसाच्या तुलनेत रोख्यांच्या किमती वाढल्याने परताव्याच्या दरात ०.१६ टक्के घट झाली. मे २०२५ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांच्या परताव्याच्या दरात ०.१२ टक्के घट झाली. आजच्या कामकाजाच्या दिवसात दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांच्या किमतीत झालेली वाढ ही मागील एका वर्षांतील एका दिवसात झालेली सर्वाधिक वाढ ठरली.
त्यापूर्वी मागील दोन आठवडय़ात मिळून पावसाच्या अनिश्चिततेमुळे मोठय़ा प्रमाणावर सरकारी रोख्यांची विक्री झाल्याने रोख्यांच्या किमती घसरल्या होत्या. परताव्याच्या दरातही ०.२९ टक्के वाढ झाली होती. परंतु मागील पन्नास वर्षांच्या सरासरीच्या ८८ टक्के पर्जन्यमान यंदाच्या जून महिन्यात आठवडाभरातच झाल्याने रोखे बाजारातील वातावरणात पालटले. २ जूनच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतविषयक आढाव्यानंतर, रोख्यांच्या किमती ०.३० ते ०.४० टक्क्यांनी घसरल्या होत्या. त्यात प्रामुख्याने गुंतवणूक करणाऱ्या बँकांना मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती होती.
रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी चार वेगवेगळ्या मुदतपूर्ती असलेले रोखे विकून १५,००० कोटी उभारले. नवीन ३० वर्षे या दीर्घ मुदतीचे आणि २०४५ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांच्या विक्रीतून ३,००० कोटी रुपये उभारण्यात आले.  शुक्रवारी झालेल्या विक्रीत या रोख्यांना ८.१३५ टक्के असा व्याजदर मिळाला.