पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की, मी दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही. तरीपण दारूचे आणि सिगारेटचे दुष्परिणाम या विषयावरील व्याख्यान ऐकायला गेलो होतो. माहिती करून घेतली तर काय बिघडते? श्रोत्यांचे हे प्रश्न ही ऊर्जा असते.
शेअर बाजार हा सर्वासाठी आहे असे मी नेहमीच म्हणत असतो. या आठवडय़ात कुलाबा येथील पदवीधर महिला संघटनेच्या सभागृहात व्याख्यान झाले. कालच माटुंगा येथे संवाद ज्येष्ठ नागरिक संघाने ‘श.. शेअर बाजाराचा’चे आयोजन केले होते.
निवृत्तीनंतर शक्यतो शेअर बाजारात गुंतवणूक करू नये असे म्हटले जाते तरीदेखील या संघाने हा कार्यक्रम आयोजित केला, हेतू हा की एखाद्या विषयाची माहिती करून घ्यायला काय हरकत आहे? ज्ञानपिपासेचे हे उत्तम उदाहरण आहे.
उपस्थित ज्येष्ठ नागरिकांपकी एका गृहस्थाने याबाबत पुलंचे उदाहरण सांगितले. पुल एकदा म्हणाले होते की, मी दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही. तरीपण दारूचे आणि सिगारेटचे दुष्परिणाम या विषयावरील व्याख्यान ऐकायला गेलो होतो. माहिती करून घेतली तर काय बिघडते?
कालच्या या मेळाव्यात श्रोत्यांनी विचारलेले प्रश्न पाहता या वयातही नागरिक किती जिज्ञासू आहेत हे जाणवले. विलास मोघे आणि प्रतिभा मोघे या दाम्पत्याने मला, ‘इतके दौरे करता, दोन दोन तास बोलता, काळजी घ्या,’ असा वडीलकीचा सल्ला देतानाच काही सूचना केल्या.
श्रोत्यांचे हे प्रश्न हीच माझी ऊर्जा असते. लाँग टर्म टॅक्स शेअर्स डीमॅट करताना लागतो का, असा प्रश्न सुयोग लोखंडे यांनी विचारला आहे. शेअर विकताना टॅक्स लागेल, डीमॅट करताना नाही. शेअर्स डीमॅट किंवा रिमॅट करताना स्टॅम्प डय़ुटी लागत नाही.
त्यांचा आणखी प्रश्न म्हणजे, रजिस्टर्ड ओनर कोणाला म्हणतात. सीडीएसएल आणि एनएसडीएल हे रजिस्टर्ड ओनर तर डीमॅट खातेदार हे बेनेफिशल ओनर. बोनस शेअर्सदेखील डिव्हिडंड मिळण्यास पात्र असतात हे उत्तर आहे, मेधा रायरीकर यांच्या प्रश्नाचे.
गेल्या आठवडय़ात आर्थिक अंधश्रद्धा याविषयी लिहिले होते. बोरिवलीतील न्यू गगनगिरी हाऊसिंग सोसायटीत नुकताच मी  ‘श..शेअर बाजाराचा’ हा स्लाइड शोसह व्याख्यानाचा कार्यक्रम केला होता.
जसे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ तसे ‘वक्ता तुमच्या दारी’ ही संकल्पना चांगलीच यशस्वी झाली. त्यानंतर अनेक हाऊसिंग सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारणा झाली. त्यांना सविस्तर उत्तरे दिली आहेतच पण एक आíथक साक्षरता चळवळ या हेतूने उपरोक्त कार्यक्रम केवळ ‘लोकसत्ता’सारख्या बलाढय़ दैनिकाच्या माध्यमातूनच आणि माध्यम प्रायोजक म्हणूनच नव्हे तर कुठल्याही संस्थेच्या सहकार्याने मी करीत असतो. रोटरी क्लब, मोठी वाचनालये, चेंबर ऑफ कॉमर्स, महाविद्यालये, ज्ञाती संस्था, मोठी गृह संकुले, कॉर्पोरेट कंपनीज, सांस्कृतिक संस्था कुणीही आमंत्रित केल्यास सीडीएसएलच्या वतीने मी व्याख्यानासाठी येत असतो. माझा सर्व खर्च सीडीएसएल करीत असल्याने आयोजक संस्थेला जागा उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त कसलाच खर्च नाही, कारण मी मानधन घेत नाही. लॅपटॉप याची व्यवस्था सीडीएसएल विनामूल्य करीत असते. तात्पर्य जास्तीत जास्त संस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्यास आíथक साक्षरता प्रसार झपाटय़ाने होईल.
गेल्या महिन्यात रोहा येथे एका छोटय़ा संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा ते म्हणाले की, बरेच दिवस हा कार्यक्रम करायचे मनात होते, पण तुम्ही दहा हजार रुपये मानधन घेता ते आम्हाला परवडत नाही. ही आर्थिक अंधश्रद्धा! मी एक रुपयादेखील घेत नाही ही वस्तुस्थिती असताना कोण हे आकडे पसरवतो देव जाणे! त्या गृहस्थांना म्हटले की, मग तुम्ही माझ्याशी बोलून तसे का विचारले नाही? ‘लोकसत्ता’त लेखाचे शेवटी माझा ई-मेल आयडी दिलेला असतो ना. ‘आम्हाला ते इंटरनेट वगरे काय ते जमत नाही हो.’ हे उत्तर! ‘तर मग फोन करायचा मला,’ इति मी. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की, तुमचा फोन नंबर आम्हाला माहीत नाही.
काय बोलावे ते कळेना मला, कारण ‘लोकसत्ता’त नुसता फोन करून विचारले तरी माझा फोन नंबर देतात. अगदी टीव्ही चॅनलवरूनदेखील जेव्हा कार्यक्रम होतो तो झाल्यानंतर आपण फोन केला तर वक्त्याचा फोन चॅनलवाले देतात. इतकी माहिती नको का? बरे ‘लोकसत्ता’ला फोन केला असता तर त्यांनी काय तुमचा अपमान केला असता का? असो. कुणालाही माझ्या व्याख्यानाचे आयोजन करायचे असेल तर ९८२०३८९०५१ इथे संपर्क साधा.

प्रभाकर मायदेव यांचा प्रश्न असा की, अ आणि ब यांचे संयुक्त डीमॅट खाते आहे आणि अ च्या नावाने ट्रेडिंग खाते आहे. अचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे डीमॅट खाते बंद करून बच्या नावे नवीन डीमॅट खाते उघडून त्यात सर्व शेअर्स हस्तांतरित होतील तेही विनामूल्य. मात्र तसे न करता अच्या वतीने ब ट्रेडिंग करीत राहिले तर काय होईल? उत्तर असे की, तुम्ही ऑनलाइन ट्रेडिंग करीत असल्याने जो काही पासवर्ड दिलेला आहे तो तुम्हा दोघांनाही माहीत होता. त्यामुळे व्यवहार तुम्ही अच्या नावाने सुरूच ठेवलेत तर डीपी किंवा ब्रोकरला कसे कळणार? मात्र हे नतिक दृष्टय़ा बरोबर नाहीच पण भविष्यात वेगळय़ा काही प्रकरणात ही बाब उघडकीस आली तर तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. परेश ठक्कर यांनी २० जून रोजी खरेदी केलेले शेअर्स त्यांच्या खात्यात २३ रोजी जमा झाले. बुक क्लोजर तारीख २२ त २८ जून अशी होती. तेव्हा बुक क्लोजर मुदत सुरू होण्याचे एक दिवस आधी या तारखेला तुमच्या खात्यात शेअर्स जमा झाले असतील तर डिव्हिडंड मिळण्यास पात्र ठरता. तुमच्या बाबतीत तसे झाले नाही. अर्थात शेअर्स खरेदी करते वेळी ब्रोकरला विचारले असतेत तर त्याने शेअरचा भाव हा डिव्हिडंड आहे की डिव्हिडंड आहे ते सांगितले असते. एक्स म्हणजे एक्स्क्ल्युडिंग म्हणजे वगळून! वसंत अम्बाडे, पुणे यांनी Indian Acryl विषयी विचारणा केली आहे. http://www.bseindia.com या साइटवर वरील कंपनीचा पत्ता वगरे माहिती दिली आहे ती पाहावी.