केंद्रातील सत्ताधारी भाजपाला नवी दिल्लीसाठीच्या निवडणूूक अंदाजात अपेक्षेप्रमाणे स्थान न मिळालेले पाहून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली. आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये ५०० अंशांची आपटी आणत मुंबई निर्देशांकाला त्याच्या गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात ठेवले. सलग सातव्या व्यवहारातील आपटीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,५५० पासून ढळला.

४९०.५२ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,२२७.३९ वर तर १३४.७० अंश आपटीसह निफ्टी ८,५२६.३५ पर्यंत स्थिरावला.
सेन्सेक्समध्ये विश्वासार्ह आणि पसंतीचा समभाग असलेल्या लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोद्वारेही तिमाही वित्तीय निष्कर्षांत काहीशी नाराजी व्यक्त केल्याने एकूणच भांडवली बाजाराचा नूर नकारात्मकच राहिला. तर परकी चलन व्यवहारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ६२ च्या खालचा नोंदविलेल्या प्रवासानेही बाजारात धडकी भरली. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांवरची नाराजी कायम ठेवत डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे उशिरा जाहीर होणारे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडय़ांचीही चिंता यावेळी व्यक्त झाली.
यापेक्षा अधिक विपरित परिणाम राजधानीतील मतदानोत्तर चाचणीच्या अंदाजाचा राहिला. या निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळत असलेल्या बहुमताच्या अंदाजाने बाजारात मोठी घसरण नोंदली गेली.
नव्या सप्ताहाची सुरुवातच २८,५६६.५० अशा घसरणीने करणारा सेन्सेक्स आठवडय़ाच्या पहिल्या सत्रातच २८,५०० चा स्तर सोडत दिवसभरात २७,१८३.३२ पर्यंत घसरला. दिवसअखेरचा त्याचा २८,५०० पासून फारकत घेणारा व २८,२२७.३९ वर बंद होणारा टप्पा हा १६ जानेवारीनंतरचा किमान स्तर राहिला. भांडवली वस्तू, पोलाद, वाहन, बँक, ग्राहकपयोगी वस्तू, तेल व वायू शुद्धीकरण निर्देशांकांवर विक्रीचा दबाव राहिला. सेन्सेक्समध्ये लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोचाच समभाग सर्वाधिक ६.६१ टक्क्य़ांसह घसरता राहिला. कंपनीने गेल्या तिमाहीत केवळ ८.७ टक्के नफ्यातील वाढ नोंदविली आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्यही एकाच व्यवहारात १० हजार कोटींनी रोडावले.
लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोसह अपोलो टायर्स, गेल, टाटा स्टील हे ताज्या तिमाही निष्कर्षांमुळे मोठय़ा घसरणीच्या यादीत पोहोचले. स्टेट बँक, एचडीएफसी बँक हे बँक क्षेत्रातील तर आयटीसी, टाटा मोटर्स या अन्य क्षेत्रातील समभागांनांही सेन्सेक्सच्या मोठय़ा घसरणीचा फटका बसला.

2रुपयाची ६२ ची धडकी महिन्याच्या गाळात
मुंबई : नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात डॉलरच्या तुलनेत ६२ च्या खालचा प्रवास नोंदविणारा रुपया सोमवारी स्थिरावताना महिन्याच्या तळात विसावला. अमेरिकी चलनापुढे त्याचे मूल्य ४८ पैशांनी रोडावले. यामुळे तो ६२ च्या खाली, ६२.१७ पर्यंत स्थिरावला. तीन आठडय़ाच्या तळात आणि २८,५०० च्या खाली गेलेल्या भांडवली बाजारातील समभाग विक्रीसाठी परकी चलनाची गरज मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्याने रुपयावर दबाव निर्माण होऊन तो सोमवारी ६२.२१ पर्यंत घसरला. ६२ पासूनच सुरुवात करणारा रुपया सत्रात कसाबसा ६१.९७ पर्यंत सावरला. मात्र दिवसअखेर त्याने १४ जानेवारीचा ६२.१८ नजीकचा प्रवास थांबविला.
भांडवली बाजारातील कमकुवता आणि अमेरिकी चलनाची भक्कमता यामध्ये रुपयाने महिन्यातील तळ अनुभवला. दिल्ली विधानसभेचे निकाल मंगळवारी अपेक्षित असताना चलन व्यवहारकर्त्यांनी सोमवारी सावध खेळी खेळली.

प्रमित ब्रह्मभट्ट,
मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हेरासिटी समूह.

दिल्लीतील मतदानोत्तर चाचणीबद्दलची निराशा भांडवली बाजाराने घसरण नोंदवित व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात असे झाल्यास लोकसभेच्या निवडणुकीनंतरचा पहिला पराजय भाजपाला अनुभववा लागेल. लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोसारख्या कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांनेही बाजारात निराशा व्यक्त केली.
जयंत मांगलीक, किरकोळ विक्री विभाग अध्यक्ष, रेलिगेयर सिक्यु.

दिल्लीतील मतदानोत्तर चाचणीचे निकाल, कंपन्यांचे निराशाजनक वित्तीय निष्कर्ष, जागतिक भांडवली बाजारातील संमिश्र वातावरण आणि येथील गुंतवणूकदारांची नफेखोरी असे चित्र बाजारात सोमवारी पहायला मिळाले. प्रमुख समभागांसह अनेक आघाडीचे क्षेत्रीय निर्देशांकही घसरले.
राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलियो.