24 January 2020

News Flash

येता काळ ‘मोदी प्रीमियम’ अनुभवण्याचा..

तब्बल सहा वष्रे मंदी आणि एका विशिष्ट आवर्तनातील मरगळीनंतर बाजाराने आकस्मिक उभारी घेतली.

तब्बल सहा वष्रे मंदी आणि एका विशिष्ट आवर्तनातील मरगळीनंतर बाजाराने आकस्मिक उभारी घेतली. मे २०१४ च्या ऐतिहासिक निवडणूक निकालाने बाजारात उन्माद भरला आणि दीड वष्रे बाजारात तेजी चौखूर उधळताना दिसली; पण गेल्या काही महिन्यांत बाजार-भावनांना पुन्हा निरुत्साहाने घेरलेले स्पष्टपणे दिसून येते. निफ्टी ५० निर्देशांकात सामील निम्म्याहून अधिक समभाग त्यांच्या वार्षकि उच्चांक पातळीपासून २० टक्के व अधिक घसरले आहेत. लक्षणीय बाब ही की, गेल्या वर्षांतील अभूतपूर्व तेजीतही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाला डॉलरमधील विनिमय मूल्याचे परिमाण लावले, तर त्याच्या सार्वकालिक उच्चांकाला पार करता आलेले नाही.
दिवाळीचा सण बाजारात फारशा आतषबाजीविनाच निघून गेला. पुढे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्‍‌र्हच्या दरवाढीभोवतीचे गूढ वलयही संपुष्टात आले आणि यापुढे फेडचा प्रवास आस्ते कदमच राहील हेही स्पष्ट झाले. तरीही २०१६ मधील संभाव्य घटनाक्रम आणि अवरोधांची चर्चा अधूनमधून डोके वर काढतच असते. चिनी अर्थव्यवस्थेची क्षतिग्रस्तता, अमेरिकेची तेलाबाबत स्वयंपूर्णता आणि जगापुढे उभे ठाकलेले शेल ऑइलचे आव्हान, रशियाची राजकीय अपरिहार्यतेतून पुढे आलेली फाजील आक्रमकता, तेलसंपन्न आखातातील संघर्ष या बाहय़ घडामोडींच्या वार्ता आलटूनपालटून आदळत राहणे स्वाभाविकच आहे. देशांतर्गत दर तिमाही कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीतील निराशांचे सुरू राहिलेले सत्र, बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाची मात्रा आणि मोठय़ा आशा जागविणारे नवे सरकारही फारसे काही करता न येणे, अशी बळावत चाललेली भावना वगरे वेगवेगळ्या काहुरांचा एकत्रित परिणाम म्हणून बाजारात तूर्तास आशावानांचा आवाज क्षीण झालेला दिसतो. एकुणात बाजारातील सध्याची नरमाई आणि निर्देशांकांचा घसरलेला पारा ही बाब पुरती स्पष्ट करतोच.
आधी म्हटल्याप्रमाणे बाजारात तेजी-अवरोध ही चक्रे सतत सुरू असतातच. म्हणूनच खरे तर बाजाराचा हा सद्यकाळ गुंतवणूकदारांसाठी आवडीचा ठरावा. ‘गुंतवणूकदार’ या संकल्पनेत अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे सध्याच्या बाजाराच्या बिकट काळात न्याय्य व माफक किमतीला उपलब्ध आणि सुदृढ पाया असलेले समभाग चोखंदळपणे निवडून त्याबाबत श्रद्धा व चिकाटी ठेवून त्यांच्याशी धर्याने इमान जपणारी व्यक्ती असाच आहे. अशा स्थितीत आपल्या निरीक्षण-संशोधनावर आधारित निवड आणि अनुमानाशी पूर्ण इमान राखून, सर्व प्रकारच्या आमिषे, अफवांकडे कानाडोळा जो करेल तोच दीर्घ मुदतीत संपत्तीचा भोक्ता ठरेल.
काळ्या ढगांच्या छायेला असलेली सोनेरी किनार ज्याला स्पष्टपणे दिसते त्या संयत गुंतवणूकदाराला सध्याचा काळ हा सर्वाधिक लाभाचा असल्याचे स्पष्टपणे आढळून येईल. उदाहरण म्हणून अमेरिकेतील जानेवारीपासून होऊ घातलेल्या व्याज दरातील वाढीचेच घ्या. होय, त्यातून आपल्या बाजाराला तात्पुरते आचके सोसावे लागतील हे खरेच आहे; पण ही दरवाढ जशी अपेक्षिली त्यापेक्षा खूपच हळुवार व मोठय़ा काळ फरकाने असेल, असे फेडकडून स्पष्ट झाल्याने, आपल्या बाजाराच्या दृष्टीने त्यामुळे काही विपरीत घडण्याचा संभव नाही.
चीनची समस्या मोठी अवघड आहे. चीनचे आपल्या चलनात पुन्हा एकदा अवमूल्यन केल्यास, त्यातून जागतिक स्तरावर चलनयुद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. चीनप्रमाणे देशांतर्गत अर्थवृद्धीच्या चिंतेने ग्रासलेले देशही मग जागतिक व्यापारातील आपला वाटा कायम राखण्यासाठी त्यांच्या चलनाचे मूल्य आपणहून कमी करून निर्यातीला उसने प्रोत्साहन देऊ करतील. जगभरात चलनवाढीचा दर निम्म्या स्तरावर असताना हे निश्चितच जागतिक अर्थव्यवस्थेला परवडणारे ठरणार नाही; परंतु यातून स्थानिक बाजारात काही अस्थिरता निर्माण झाल्यास, भारतीय गुंतवणूकदार म्हणून आपल्यासाठी खालच्या किमतीत समभागांच्या खरेदीसाठी ती आणखी एक संधी असेल. एक लक्षात असू द्यावे की, सद्य वातावरणात जगातील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम अशी उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून भारताचे अग्रस्थान या घडामोडींमधून अधिकाधिक बळकट होत चालले आहे. तिमाही स्तरावर आपण आताच चीनपेक्षा सरस आíथक विकास दर नोंदविला आहे. संपूर्ण २०१६ वर्षांत आपण या आघाडीवर चीनच्या खूप पुढे असण्याचाच संभव मोठा आहे.
देशांतर्गत परिस्थितीकडे वळू या. रिझव्‍‌र्ह बँकेने सरलेल्या २०१५ सालात रेपो दर तब्बल सवा टक्क्यांनी कमी केला आहे. २०१६ सालात आणखी किमान एक टक्क्याची रेपो दरात घट संभवते. अनेकांना हे आश्चर्यकारक वाटेल, पण अशीच शक्यता आहे. कारण तुटीचा पाऊस, दुष्काळानंतरही महागाई दर (चलनवाढ) पुरता आटोक्यात आहे. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरून आयात होणाऱ्या जिनसांच्या घसरलेल्या किमतींनी साधलेला हा तात्पुरता परिणाम नाही, तर किरकोळ किमतीवर आधारित निर्देशांक दर्शवितो त्याप्रमाणे, हे पुढे आणखी काही काळ सुरू राहणारे प्रचलन आहे.
कोणत्याही सरकारच्या कार्यकाळाचे तिसरे वर्ष हे कायम मोलाचे असते. तिसऱ्या वर्षांत इच्छिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचे दमदार पाऊल या सरकारकडून पडेल आणि आíथक सुधारणाप्रणीत कार्यक्रमांचे अर्थव्यवस्थेतही ठळक प्रतििबब उमटताना दिसून येईल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा हे त्यांच्या अलीकडच्या पत्रकार परिषदा आणि वक्तव्यांमधून, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा, अनुदान भारात कपात, रोजगारनिर्मिती, कृषी क्षेत्रातील वाढीला गती, बँकिंग सुधारणा, केंद्र-राज्य आíथक ढाचा आणि सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ या आपल्या पूर्वापार चालत आलेल्या विकासाच्या समस्यांवर मुद्देसूद आणि एकाच दमात ठोस आणि प्रेरणादायी सुरात बोलताना आढळले आहेत. अर्थात चालू आíथक वर्षांची शेवटच्या तिमाहीची कामगिरी आणि मुख्य म्हणजे नव्या वर्षांसाठी अर्थसंकल्प नजीकच आहे. किती खरे, किती खोटे हे त्यातील आकडेवारीतून दिसून येईलच; पण एक मात्र खरे की, भारताच्या राजकारणाचा लोलक हा हळूहळू जातपात-धर्माधिष्ठतेकडून विकासाच्या बाजूने सरकू लागला आहे.
आपल्या अर्थव्यवस्थेत वाहू लागलेल्या अनुकूल वाऱ्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करून कसे चालेल. चालू खात्यावरील तूट आणि वित्तीय तूट या दुहेरी तुटीतील निर्धारित पातळीप्रमाणे झालेला सुधार हे सरकारचे मोठे सुयश आणि भांडवली बाजारासाठी खूप मोठी सकारात्मक बाब ठरेल. दुसरीकडे जगभरातील विश्लेषकांच्या कयासावर भिस्त ठेवायची, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या जिनसांच्या किमती आणखी काही रोडावलेल्याच राहतील, जी भारतासारख्या आयातदार देशासाठी आणि वर उल्लेखिलेल्या दोन्ही तुटींच्या संदर्भात मदतकारकच ठरेल.
ऐतिहासिकदृष्टय़ा बाजाराकडे नजर वळविल्यास, वाढीची प्रचंड मोठी क्षमता असूनही, १९९४ साली जेव्हा विदेशी गुंतवणूकदार संस्थांना (एफआयआय) स्थानिक बाजारात गुंतवणुकीची परवानगी मिळाली तेव्हापासून अल्पसंतुष्ट भारतीय गुंतवणूकदाराची भूमिका ही विक्रेत्याचीच राहिली आहे. स्थानिक भांडवली बाजाराच्या एकूण बाजार भांडवलात व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांचे स्वामित्व हे आजही भिकार ८ टक्के पातळीवर सीमित आहे. शोकांतिका ही की, आपले दुर्दैवी गुंतवणूकदार हे वार्षकि सरासरी १४ ते १६ टक्के परतावा देणारे समभाग विकून, जेमतेम ७ ते ९ टक्के परतावा दिलेल्या स्थावर मालमत्ता, सोने व मुदत ठेवींच्या खरेदीकडे वळल्याचे आढळले आहे.
आता तरी आपला दृष्टिकोन बदलू या. समभाग बाजाराला त्याच्या वाटय़ाची आस्था आणि विश्वास मिळायलाच हवा.
संपूर्ण बाजाराची चिंता आपल्याच उरावर आहे, हा आविर्भाव सोडून द्या; किंबहुना चिंतेचा घटक पूर्णपणे दुर्लक्षित करून, निवड पक्की करा आणि त्या समभागाचा संधी मिळेल तेव्हा पुढे काही काळ पाठलाग निर्धास्तपणे सुरू ठेवावा, हेच आपले धोरण असायला हवे. बाजारातील अस्थिरतेपेक्षा काळाने उपलब्ध केलेल्या संधीने तुम्हाला खुणावले पाहिजे. विदेशी भांडवल आणि गुंतवणुकीबद्दल आपण चिंता का करावी? त्याने आपले बूड तात्पुरते हलवलेले दिसेल; पण चिंता करू नका, भारतीय अर्थव्यवस्थेचे अद्वितीय तेज त्याला नि:संशय पुन्हा खेचून आणेल. अर्थात याला बाजाराकडून त्याला ‘मोदी प्रीमियम’ची साहजिकच जोड मिळेल. जी फक्त चुणूकभर आपण २०१४ सालात अनुभवली तिचा पूर्णाशांने आविष्कार येता काळ दाखवेल. एकुणात निष्कर्षांला, अभूतपूर्व अशा धुवाधार तेजीचा काळ फार दूर नाहीच.
(लेखक ‘आयआयएफएल’ या दलाली पेढीतील संशोधन प्रमुख आहेत.)

First Published on December 23, 2015 1:27 am

Web Title: share market condition after narendra modi came to power
टॅग Share Market
Next Stories
1 आयडीबीआय बँक-माविम सामंजस्य
2 गुंतवणूकदारांची ख्रिसमस खरेदी!
3 सन फार्माला पुन्हा झटका
Just Now!
X