नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सलग दुसऱ्या सत्रात घसरणाऱ्या भांडवली बाजाराने सोमवारी १५९.२१ अंश घसरण नोंदविली. यामुळे मुंबई निर्देशांक २५,६७८.९३ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४.२५ अंश घसरण झाल्याने प्रमुख निर्देशांक ७,८५५.०५ पर्यंत आला.

७,८५५ वर येऊन ठेपलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाचा सोमवारचा प्रवास ७,९११ ते ७,८२७ दरम्यान राहिला. चालू आठवडय़ातच महिन्यातील वायदापूर्तीची अखेर (गुरुवारी) आहे. परिणामी तूर्त वरच्या टप्प्यावर असलेल्या बाजारात नफेखोरीचे वातावरण काही सत्रे कायम राहण्याचा अंदाज बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरगुंडीही आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजारावर विपरित परिणाम करणारी ठरली. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभागांचे मूल्य घसरले. तर ९ समभागांना मागणी राहिली. गेल्या आठवडय़ात यशस्वी तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातही सोमवारी २ टक्क्य़ांपर्यंत घसरण झाली. सर्वात मोठय़ा तिमाही तोटय़ाची नोंद करणाऱ्या केर्न इंडियाचा समभाग तब्बल ४.१३ टक्क्य़ांनी आपटला.

यामुळे कंपनीचे एकाच सत्रात १,१७१ कोटींचे बाजारमूल्य ऱ्हास झाले. त्याचबरोबर मारुती सुझुकी, ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, एचडीएफसी, भेल, आयटीसी, सन फार्मा, टाटा मोटर्स यांच्या समभागांचेही मूल्य रोडावले. तर वधारलेल्या समभागांमध्ये भारती एअरटेल, टीसीएस, बजाज ऑटो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक यांचा क्रम राहिला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा निर्देशांक सर्वाधिक, १.४३ टक्क्य़ांसह घसरला. तसेच पोलाद, पायाभूत सेवा सुविधा निर्देशांकही अनुक्रमे १ टक्क्य़ापर्यंत घसरले.

वाहन, माहिती निर्देशांक घसरणीपासून लांब राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड  कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.३९ व ०.१४ टक्के घसरण झाली.

सप्ताहाच्या सुरुवातीलाच भांडवली बाजारावर जागतिक संभाव्य घडामोडींचे परिणाम जाणवले. चालू आठवडय़ातील अमेरिकीची फेडरल रिझव्‍‌र्ह, बँक ऑफ जपान या मध्यवर्ती बँकांमार्फत व्याजदराबाबत घेतले जाण्याच्या निर्णयाने जगभरातील प्रमुख निर्देशांकावर परिणाम जाणवले. त्यातच येथील सेन्सेक्स व निफ्टी हे निर्देशांकही आलेच. सोमवारपासूनच सुरू झालेल्या संसदेच्या विस्तारित अधिवेशनानेही येथील बाजाराने काहीशी चिंता निर्माण झाली. या अधिवेशनात वस्तू व सेवा कर तसेच बँक दिवाळखोरी संहितेसारखी महत्त्वाची विधेयके सादर होण्याची शक्यता आहे.

रुपयात  पुन्हा धास्ती; चलनात  १४ पैसे घसरण

परकी चलन विनिमय व्यवहारात सोमवारी डॉलरच्या समोर रुपया पुन्हा कमकुवत बनला. आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात स्थानिक चलन १४ पैशांनी घसरत डॉलरच्या तुलनेत ६६.६२ पर्यंत आले. सप्ताहाची सुरुवात करताना रुपया सुरुवातीला ६६.६५ या किमान स्तरावरच होता. सत्रात तो आणखी घसरत ६६.७६ पर्यंत खाली आला. सोमवारची त्याची घसरण टक्केवारीत ०.२१ होती. शुक्रवारी रुपया ६६.४८ वर बंद झाला होता. गेल्या तीन व्यवहारात रुपया ४० पैशांनी कमकुवत झाला आहे.

सोने-चांदी दरात उतार

मुंबई : शहरातील सराफा बाजारात मौल्यवान  धातूचे दर सप्ताहारंभी कमालीचे उतरले. स्टॅण्डर्ड सोने दरात तोळ्यामागे सोमवारी एकदम २४० रुपये घसरण येऊन पिवळ्या धातूला २९,११५ रुपयांचा भाव मिळाला. तर शुद्ध सोने याच प्रमाणात आ िण याच वजनाकरिता कमी होत २९,२६५ रुपयांवर येऊन ठेपले. तर चांदीच्या दरातही सोमवारची घसरण तुलनेत मोठी होती. पांढरा धातू किलोमागे सप्ताहारंभीच्या पहिल्या व्यवहारात तब्बल ५५० रुपयांनी कमी होत ४०,२५० रुपयांवर स्थिरावला.