सत्रारंभी हजाराहून अधिक अंशांची आपटी अनुभवणारे निर्देशांक उत्तरार्धात लक्षणीयरित्या सावरत अखेर, शुक्रवारच्या तुलनेत माफक नुकसान सोसत सोमवारी बाजार बंद झाले.

व्यवहारात १,०३५.७१ अंश घसरण अनुभवल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची अखेर ३९७ अंशांनी खाली, ५०,३९५.०८ वर केली. तर १०१.४५ अंश घसरणीसह निफ्टी १४,९२९.५० वर बंद झाला. डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या भक्कमतेने स्थानिक गुंतवणूकदारांनी मोठी घसरण थोपवून धरली.

गेल्या सप्ताहाखेर, भांडवली बाजारातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर जाहीर झालेल्या उणे स्थितीतील औद्योगिक उत्पादन दर तसेच वाढत्या किरकोळ महागाई दराबाबतची चिंता अपेक्षेप्रमाणे सोमवारच्या व्यवहारादरम्यान येथील भांडवली बाजारात उमटली.

महाराष्ट्रासह देशभरातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येने तसेच अंशत: टाळेबंदी निर्बंधानेही गुंतवणूकदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. परिणामी, सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीत घसरण नोंदली गेली. दोन्ही निर्देशांक सत्रात पाऊण टक्क्यापर्यंत घसरले.

एमटार टेकला      पदार्पणाला दुप्पट भाव

सोमवारी एमटार टेक्नॉलॉजिजच्या समभागांचे भांडवली बाजाराचे दमदार पदार्पण झाले. कंपनीने प्रारंभिक विक्रीपश्चात जारी केलेल्या मूल्याच्या तुलनेत ८८ टक्के अधिक म्हणजे प्रति समभाग १,०६३.९० रुपयांनी या समभागांचे बाजारात सूचिबद्धतेला व्यवहार सुरू झाले. सत्रात मूल्य १,१५४ रुपयांपर्यंत झेपावल्यानंतर, सत्रअखेर हा समभाग १,०८२.२५ रुपयांवर स्थिरावला. प्रति समभाग ५७४ ते ५७५ रुपये दराने कंपनीने राबविलेल्या प्रारंभिक भागविक्रीत विक्रीसाठी उपलब्ध समभागांसाठी २०० पटीने अधिक गुंतवणूकदारांकडून मागणीचे अर्ज आले होते.