सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदवित भांडवली बाजाराने सप्ताहअखेर मोठी वाढ नोंदविली. सार्वजनिक बँकांना मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर एकूणच सेन्सेक्सही शुक्रवारी तब्बल ४०९.२१ अंशांची झेप घेणारा ठरला. यामुळे मुंबई निर्देशांकाने २८ हजाराचा टप्पा पार करत थेट २८,११४.५६ पर्यंत मजल मारली.
महिन्यातील पहिली मोठी वाढ नोंदविताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही सप्ताहअखेर ८,५०० अनोखा पल्ला मागे टाकला. देशातील सर्वात मोठय़ा निर्देशांकात शुक्रवारी एकदम १११.०५ अंश भर पडल्याने निफ्टी आता ८,५३२.८५ पर्यंत पोहोचला आहे. साप्ताहिक तुलनेत दोन्ही निर्देशांकाची कामगिरी मात्र स्थिर राहिली आहे.
सरकार स्तरावर झालेल्या आर्थिक सुधारणांच्या घोषणांनी बाजाराला सप्ताहअखेर जणू उत्साहच संचारला होता. सेन्सेक्स २६० अंशांनी वाढत सुरुवातीलाच २८ हजारानजीक पोहोचला. सत्राचा नव्या महिन्यातील वायदा पूर्तीचा पहिलाच दिवस होता. तर निफ्टीचीही ८,४५० पुढील वाटचाल सुरू होती.
देशातील सार्वजनिक बँकांना सप्टेंबरमध्ये २० हजार कोटी रुपये देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे बाजाराने जोरदार स्वागत केले. याचवेळी सेन्सेक्स २८ हजार तर निफ्टी ८,५०० नजीक पोहोचला. त्याचबरोबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम भांडवली बाजारात येण्याचा मुहूर्त स्पष्ट झाल्यानंतर तेजीने अधिक वेग घेतला.
सार्वजनिक बँक समभागांच्या वाढीबरोबरच सेन्सेक्सला खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेच्या वाढीव तिमाही नफ्यानेही हातभार लावला. तिच्यासह स्टेट बँक सेन्सेक्समध्ये आघाडीवर राहिला. त्याचबरोबर कोल इंडिया, ल्युपिन, डॉ. रेड्डीज, हीरो मोटोकॉर्प यांनीही सेन्सेक्सच्या तेजीत भर घातली. मुंबई निर्देशांकातील केवळ पाच समभागांचेच मूल्य एकूण तेजीनंतरही घसरले. क्षेत्रीय निर्देशांकात स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा क्षेत्र सर्वाधिक वाढते राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅपही एक टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात उंचावले.
यापूर्वीच्या दोन व्यवहारात सेन्सेक्स २४६.१२ अंशांनी वाढला होता. शुक्रवारच्या तेजीने मुंबई निर्देशांकाने महिन्यातील सर्वात मोठी सत्र झेप नोंदविली. सेन्सेक्सने यापूर्वी २२ जून रोजी ४१४.०४ अंशांची वाढ एकाच व्यवहारात राखली आहे.
तीन व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांकाची वाढ आता ६५५ पल्याड गेली आहे. निफ्टीनेही शुक्रवारी महिन्यातील पहिली सर्वोत्तम झेप नोंदविली.
बँक समभागांसाठी कमाईचा दिवस!
* २८ हजारापुढे वाटचाल नोंदविणाऱ्या सप्ताह व महिनाअखेरच्या सत्रात बाजारात बँक समभाग चांगलेच चर्चेत राहिले. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अतिरिक्त २५,५०० कोटी रुपये चालू आर्थिक वर्षांत ओतण्याच्या प्रस्तावाला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर या क्षेत्रातील बँकांचे समभाग मूल्य मुंबई शेअर बाजारात थेट ८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. एकूणच बँक निर्देशांक शुक्रवारअखेर १.६८ टक्क्य़ांनी उंचावला.
* स्टेट बँक रु. २७०.४० (+५.२५%)
* बँक ऑफ बडोदा रु. १७७.४० (+५.३४%)
* कॅनरा बँक रु. २७६.२५ (+५.१६%)
* बँक ऑफ इंडिया रु. १६३.०५ (+४.०९%)
* पंजाब नॅशनल बँक रु. १५०.९० (+०.६७%)