गुरुवारच्या भूकंपानंतर शुक्रवारी शेअर बाजार सावरला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारला असून सेन्सेक्सचा निर्देशांक ३४, ४६८.२९ वर पोहोचला आहे. तर निफ्टीनेही १३५ अंकांनी मुसंडी मारली आहे.

अमेरिकेसह जगभरातील प्रमुख शेअर मार्केटमधील पडझडीचा परिणाम गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीवर झाला होता. गुरुवारी दिवसभरात सेन्सेक्स ७६० अंकांच्या घसरणीसह ३४, ००१.१५ वर स्थिरावला. तर निफ्टी २२५. ४५ अंकांनी खाली येत १०.२३४. ६५ पर्यंत थांबला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजारात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.  शुक्रवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ४५० अंकांनी वधारला. तर निफ्टीही १३५ अंकांनी वधारला. यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.

दरम्यान, शुक्रवारी कच्चा तेलाचे दर प्रति पिंप ८०. ३० डॉलरवर पोहोचले आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही वाढ झाली. शुक्रवारी सकाळी रुपयाचे मूल्य २९ पैशांनी उंचावत ७३. ८३ वर पोहोचले.