अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचा फटका भारताच्या शेअर बाजाराला बसला आणि गुरुवारी सकाळी सेन्सेक्स एक हजार अंकांनी गडगडला. शेअर बाजारातील पडझडीमुळे पाच मिनिटांत गुंतणूकदारांच्या चार लाख कोटी रुपयांची राख झाली.

अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये आठ महिन्यांमधील सर्वात मोठी घसरण बुधवारी झाली. याचे पडसाद आशियातील शेअर बाजारावरही उमटले. जपान, चीन, हाँगकाँग, सिंगापूरसह भारताच्या शेअर बाजारात भूकंपच आला. गुरुवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांनी गडगडला. तर निफ्टीमध्येही ३०० हून अंकांची घसरण झाली. यामुळे अवघ्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटींचा चुराडा झाला.

विशेष म्हणजे, बुधवारीच शेअर बाजाराने ४६१ अंकांची मुसंडी घेतल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची भर पडली. मात्र, हा दिलासा फक्त एका दिवसासाठीच ठरला. गुरुवारच्या भूकंपामुळे अवघ्या पाच मिनिटांत ४ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाल्याने गुंतवणूकदार हवालदील झाले.

शेअर बाजारातील भूकंपात सर्वाधिक नुकसान इन्फोसिस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांच्या शेअर्सचे झाले आहे.मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल १३४. ३८ लाख रुपयांवर आले आहे.  दरम्यान, जागतिक बाजारपेठेला प्रभावित करणाऱ्या कच्चा तेलाच्या किंमतीत गुरुवारी घसरण झाली. गुरुवारी कच्चा तेलाची किंमत प्रति पंप ८२ डॉलरवर आली.