शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल २९१९ अंकांनी कोसळला. करोना व्हायरसचा जगभरात होत असलेला फैलाव या पडझडीला कारणीभूत आहे. करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने घसरण सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा सुद्धा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
गुरुवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यानंतर दिवसभर घसरण सुरु होती. दिवसअखेर २९१९ अंकांच्या घसरणीसह ३२,७७८ अंकांवर सेन्सेक्स स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८६८ अंकांच्या घसरणीसह ९५९० अंकांवर स्थिरावला.
मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला आहे. ४० हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये ३२ हजारापर्यंत घसरण झाली आहे. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले आहे. सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्सची पडझड होण्यामागे ही सुद्धा दोन प्रमुख कारणे आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2020 9:45 am