27 May 2020

News Flash

तेजीचा षटकार; गुंतवणूकदार ६ लाख कोटींनी श्रीमंत

सहा सत्रांत सेन्सेक्स १,२०० अंश कमाईसह  ३९,३०० वर

(संग्रहित छायाचित्र)

सहा सत्रांत सेन्सेक्स १,२०० अंश कमाईसह  ३९,३०० वर

मुंबई : स्थानिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता काहीशी बाजूला ठेवत, प्रमुख कंपन्यांचे समाधानकारक तिमाही निकाल आणि ब्रेग्झिट कराराच्या साफल्यासह आंतरराष्ट्रीय घडामोडीतील सकारात्मकता भांडवली बाजाराला चांगलीच फळली आहे. बाजारातील सलग सहाव्या निर्देशांक तेजीने सेन्सेक्सने जवळपास १,२०० अंशांची कमाई केली; शिवाय सर्वात जुन्या बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्तीही सहा लाख कोटी रुपयांनी वाढली.

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालाच्या स्वागताला सप्ताहअखेरच्या टप्प्यात ब्रेग्झिट घडामोडींचीही जोड भांडवली बाजाराला मिळाली आहे. आठवडय़ापूर्वी ३८,१२७.०८ अंशांवर असलेला मुंबई निर्देशांक – सेन्सेक्स सलग सहा व्यवहारातील १,१७१.३० अंश तेजीने शुक्रवारअखेर ३९,३०० नजीक पोहोचला आहे.

मार्च २०१९ च्या मध्यातील सलग तेजीनंतर सेन्सेक्सने यंदा प्रथमच एवढय़ा सत्रातील निर्देशांक वाढ राखली आहे. निफ्टीतील वाढ या दरम्यान ३५६.८० अंशांपर्यंत नोंदली गेली आहे. प्रमुख दोन्ही निर्देशांक या दरम्यान प्रत्येकी ३ टक्क्यांहून अधिक प्रमाणात उंचावले आहेत. मुंबई शेअर बाजारातील सर्व, १९ क्षेत्रीय निर्देशांक वाढले. तर भांडवली व्यवहारानंतर तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या रिलायन्सने १.३७ टक्के समभाग मूल्यवाढीसह (बंद भाव रु. १,४१५.२०) ९.०५ लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा विक्रम नोंदविला.

मुंबई निर्देशांकाचा सप्ताहअखेरचा सत्रप्रवास ३९ हजारांपुढेच राहिला. आठवडय़ाची अखेर याच टप्प्यावर करण्यापूर्वी व्यवहारात तो ३९,३८१.०६ पर्यंत पोहोचला होता. शुक्रवारी सेन्सेक्स २४६.३२ अंश वाढीसह ३९,२९८.३८ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारच्या तुलनेत सप्ताहअखेर ७५.५० अंश वाढीने ११,६६१.८५ पर्यंत पोहोचला.

रिलायन्सकडून बाजार भांडवलात ९ लाख कोटींचा ऐतिहासिक टप्पा

देशातील अग्रणी तेल व वायू ते किरकोळ विक्री, दूरसंचार क्षेत्रातील व्यवसाय समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारच्या निर्देशांक तेजी घडामोडीत सर्वाधिक बाजार भांडवलाचा विक्रम नोंदविला. बाजार व्यवहारानंतर चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करण्यापूर्वी कंपनीने मुंबई शेअर बाजारात प्रथमच व्यवहारात ९,०५,२१४ कोटी रुपयांच्या बाजार मूल्याला गवसणी घातली. सत्रात कंपनीच्या समभागाने गुरुवारच्या तुलनेत २.२८ टक्क्यांची झेप घेतली होती. दिवसअखेर ८.९७ लाख कोटींच्या बाजारमूल्याची नोंद करणाऱ्या रिलायन्सने टीसीएसला ७,७१,९९६.८७ कोटी रुपये बाजारमूल्यासह आपल्यापासून अधिक दूर ठेवले. रिलायन्सने ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वप्रथम ८ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवलाची नोंद केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 12:22 am

Web Title: share market sensex up over 1200 points zws 70
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : दिवाळीची तयारी
2 रिलायन्सला विक्रमी नफा; फोन ग्राहकसंख्येत वाढ
3 पैशाचे सुरक्षित व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचे मार्गदर्शन
Just Now!
X