20 February 2019

News Flash

शेअर बाजार गडगडला, सेकंदांमध्ये गुंतवणूकदारांनी गमावले २.२४ लाख कोटी रुपये

सेन्सेक्स ५०० अंशांनी घसरला

प्रतिकात्मक छायाचित्र

अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाले. शुक्रवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी घसरला. शेअर बाजार सुरु होताच अवघ्या काही सेकंदांमध्ये झालेल्या या पडझडीमुळे सुमारे गुंतवणूकदारांचे सुमारे २.२४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.

शुक्रवारी सकाळी शेअर बाजार सुरु होताच ५०० अंकांनी घसरुन ३३, ८९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीतही जवळपास १५० अंकांनी घसरण झाली. गेले आठवडाभर अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या तुफानी विक्रीचा थेट परिणाम जगभरातल्या बाजारांवर पडला आहे. अमेरिकेमध्ये अनेक वर्ष शून्याच्या आसपास असलेले व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे व्याजदर तीन टक्क्यांपर्यंत भविष्यात वाढवण्याचा फेडरल रिझर्व्हचा प्रस्ताव आहे. यामुळे सरकारी कर्जरोख्यांवरील परतावा वाढणार असून महागाईही भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा परिणाम म्हणून शेअर्समधली गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते. त्यामुळेच अमेरिकेतील शेअर बाजारातून प्रचंड प्रमाणात अंग काढण्याचा प्रकार घडला आहे.

त्यामुळे गेल्या आठवड्याभरात अमेरिकेचे डाऊ व स्टँडर्ड अँड पूर हे निर्देशांक तब्बल १० टक्क्यांनी घसरले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात १६०० अंकांनी घसरलेला डाऊ काल पुन्हा १००० अंकांनी घसरला. त्याचा थेट परिणाम सेन्सेक्स व निफ्टीसह जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये बघायला मिळाला.

आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब, कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्सचे दर खाली होते. शुक्रवारी सकाळी परिस्थिती इतकी बिकट झाली की सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी एकाही शेअरचा भाव वधारला नाही.

दरम्यान, गुरुवारी शेअर बाजारातील सलग सात दिवसांची घसरण मोडून काढताना सेन्सेक्स ३३०. ४५ अंकांनी वाढून ३४, ४१३. १६ वर स्थिरावला होता. तर निफ्टीत १००.१५ अंकांनी भर पडून हा निर्देशांक १०, ५७६.८५ वर पोहोचला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा शेअर बाजार गडगडल्याने गुंतवणूकदारांच्या कोट्यधी रुपयांचे नुकसान झाले.

First Published on February 9, 2018 9:55 am

Web Title: share market updates sensex down by 500 points nifty fall investors lose rs 224 lakh crore in seconds