केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार येण्याच्या आशेने सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात उत्साह दिसून आला. सकाळी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला. सेन्सेक्सने ३९, ५५४. २८ चा पल्ला गाठला आहे.

सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या निर्विवाद यशाच्या अंदाजाचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारावर उमटले. सेन्सेक्स सोमवारी सेन्सेक्स ३९,३५२.६७ वर तर निफ्टी ११,८२८.२५ पर्यंत स्थिरावला होता. मंगळवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने १०४. ५८ अंकांची झेप घेत ३९, ४५७. २५ चा पल्ला गाठला. तर निफ्टीनेही २८. ८० अंकांची उसळी घेत ११, ८५७. १० चा पल्ला गाठला. यानंतर तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्सने ३९, ५५४. २८ हा ऐतिहासिक उच्चांकही गाठला होता.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल ४९ पैशांनी झेपावत ६९. ७४ वर स्थिरावले होते. मंगळवारी सकाळीही रुपयाचे मूल्य ६९. ७४ वरच स्थिर होते.