रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणाकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजारात फारसे व्यवहार केले नाहीत. ६५.५८ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,७७७.४५ वर थांबला, तर १९.७५ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२०१.०५ पर्यंत विसावला. व्यवहारात ८,२३४.७० पर्यंत वाढणाऱ्या निफ्टीच्या गेल्या सलग तीन व्यवहारांतील तेजीला या रूपाने खीळ बसली.
रिझव्‍‌र्ह बँकेचे द्विमासिक पतधोरण गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे मंगळवार, ७ जून रोजी जाहीर करणार आहेत. या पतधोरणात तूर्त स्थिर व्याजदर राहण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याबाबत फारशी अपेक्षा नसलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात व्यवहार कमी प्रमाणात केले.
माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्य निगा, तेल व वायू आदी क्षेत्रांतील समभागांमध्ये मूल्य घसरण झाली. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य घसरले.
यात भारती एअरटेल, ल्युपिन, मारुती सुझुकी, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया आदींचा समावेश राहिला, तर मागणी असलेल्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, गेल, सिप्ला, आयटीसी, भेल यांचा क्रम राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक १.३९ टक्क्य़ांसह घसरला.

रुपया तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर
मुंबई : परकी चलन विनिमय व्यवहारात रुपया आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी गेल्या तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर विराजमान झाला. सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविताना रुपयाने सोमवारी २८ पैशांची भर घातली. यामुळे स्थानिक चलन ६६.९७ या त्याच्या १८ मे २०१६ नंतरच्या वरच्या स्थानावर पोहोचले. गेल्या सलग तीन सत्रांत मिळून ४८ पैशांची तेजी नोंदविणाऱ्या रुपयाचा सोमवारचा प्रवास ६६.८५ पर्यंत झेपावला.

सोने २९ हजार; तर चांदी ३९ हजारांवर
मुंबई : सराफा बाजारात नव्या आठवडय़ात पुन्हा मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये वाढ नोंदली गेली. सोमवारी स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा भाव सोमवारी तब्बल ४६० रुपयांनी उंचावत २९ हजाराच्या पल्याड २९,११५ रुपयांवर गेला, तर चांदीच्या दरात किलोमागे एकदम ५९५ रुपयांनी वाढ होत पांढरा धातू ३९,५४० रुपयांवर पोहोचला.

खनिज तेल ५० डॉलरखाली
लंडन : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति िपप ५० डॉलरखाली आले आहेत. सप्ताहारंभी त्यात गेल्या शुक्रवारच्या तुलनेत ०.७१ टक्के घसरण झाल्याने काळ्या सोन्याला ४९ डॉलरचा भाव मिळाला. खनिज तेल २०१६ च्या सुरुवातीला त्याच्या गेल्या १३ वर्षांच्या तळात विसावले होते. तेव्हापासून त्यात आता ८५ टक्के भर पडली पडली आहे.