देशातील तिसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी असलेल्या स्पाईसजेटचे मुख्य प्रवर्तक कंपनी ‘काल एअरवेज’च्या संचालकपदाचे दयानिधी आणि पत्नी कावेरी मारन यांनी राजीनामे दिल्याने एकूणच स्पाईसजेटच्या हिस्सा विक्रीची चर्चा रंगू लागली आहे. कंपनीला अधिक विस्तारासाठी भांडवलाची आवश्यकता असली तरी त्यासाठी हिस्साविक्री केली जाणार नाही, असे मारन यांच्या ‘सन समूहा’द्वारे लगोलग स्पष्ट करण्यात आले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या मारन यांच्या सन समूहाने नुकतेच ४८ टक्के हिस्सा खरेदी करीत भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या स्पाईसजेटवर आपले वर्चस्व निर्माण केले होते. आता मारन दाम्पत्यच पुढारपण असलेल्या ‘काल एअरवेज’च्या संचालक मंडळावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्पाईसजेटच्या हिस्सा विक्रीच्या चर्चेला बळ मिळाले.

याबाबत सन समूहाने खुलासा करताना म्हटले आहे की, विमान वाहतूक कंपनीला अधिक विस्तार करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असून विद्यमान भागधारकांसह, भांडवली बाजार तसेच कर्ज उभारणी आदी पर्याय आहेत. मात्र प्रवर्तक त्यांचे कोणतेही समभाग विकणार नाहीत. विस्तारासाठी कंपनीला निधी हवा असून जो आकर्षक पर्याय असेल तो स्वीकारला जाईल, असे सन समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी एस. एल. नारायणन यांनीही सांगितले.

काल एअरवेजमधील मारन कुटुंबियांचे अस्तित्व कमी करण्यासाठी राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला, असेही यानिमित्ताने बोलले आले आहे. तथापि स्पाईसजेटचे अध्यक्षपद कुटुंबातील कलानिधी मारन यांच्याकडेच आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

खाजगी क्षेत्रातील किंगफिशर एअरलाईन्सची उड्डाणे बंद पडल्यावर स्पाईसजेट एकदम तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. कंपनीचा सध्या १९.१ टक्के बाजारहिस्सा असून गेल्या महिन्यात स्पाईसजेटच्या प्रवाशांची संख्या ८.६९ लाख होती. कंपनी तूर्त दिवसाला ३८ शहरांमधून ३०० उड्डाणे घेत असून यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. कंपनीला आगामी आर्थिक वर्षांत अधिक ठिकाणांहून उड्डाणे सुरू करावयाची असून ताफ्यात अनेक विमानेही दाखल करून घ्यावयाची आहेत. भारतीय हवाई क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुले झाल्यावरही कंपनीने भागीदार शोधण्यास नकार दिला होता. कंपनीने दुसऱ्या तिमाहीअखेर १६४ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे.  

दिवसभराच्या उलटसुलट चर्चेनंतरही शेअर बाजारात स्पाईसजेटचा समभाग तब्बल ७ टक्क्यांनी उंचावला. समभागाचा बुधवारचा बंद भाव ३७.९० रुपये झाला तर कंपनीचे बाजारमूल्य १५१ कोटी रुपयांनी वधारले.

स्पाइस जेट   रु. ३७.९०    ७.००%

जेट एअरवेज  रु. ४५१.५    ९.२०%

किंगफिशर    रु. १३.५४    १.९६%

 

स्पर्धक बाजूला; क्रम उंचावला..

कट्टर स्पर्धक बाजूला पडणे भारतीय हवाई क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिना जमिनीवर राहिलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानांमुळे अन्य कंपन्यांचा कामगिरीचा आलेखा काहीसा उंचावला आहे. यात पहिले स्थान अर्थातच इंडिगोने काबीज केले आहे. कंपनीच्या सर्वाधिक २७.८ टक्क्यांच्या बाजारहिश्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाचा क्रमांक लागला आहे. २०.८ टक्के बाजारहिस्सा राखणाऱ्या एअर इंडियाने गेल्या महिन्यात ९.४९ लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. तर सन समूहाच्या मारन कुटुंबियांनी ताबा मिळविलेल्या स्पाईसजेटने ऑक्टोबर महिन्यात १९.१ टक्के बाजारहिस्सा राखतानाच ८.६९ लाख प्रवासी वाहतूक नोंदविली आहे.