१९९६ साली देशात डिमॅट प्रणाली अस्तित्वात आली, १९९८ साली ते सक्तीचे झाले आणि त्यानंतर सर्व व्यवहार डिमॅट स्वरूपातच होऊ लागले. गेल्या १६ वर्षांत ज्या लोकांकडे शेअर्स सर्टिफिकेट्स होती त्यापकी सुमारे ९५ टक्के सर्टिफिकेट्स डिमॅट झाली आहेत..
४६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक टप्प्यावर झालेले बदल, चांगल्या-वाईट घटना यांच्याशी जवळून संबंध आला. मुख्यत शेअर सर्टिफिकेटच्या जागी डिमॅट पद्धती आली ही एक क्रांतीच होती आणि त्या प्रक्रियेचा एक भागीदार व साक्षीदार व्हायला मिळाले याचा आनंद वाटतो. ट्रस्ट- विश्वस्त संस्था असे स्वरूप असलेले बीएसई आता लिमिटेड कंपनी बनली आहे. डॉक्टर, वकील, व्यावसायिक यांच्यापुरता सीमीत असलेला शेअर बाजार आता सर्वसामान्य नोकरदारांनाही आपलासा वाटू लागला. कुठल्याही कंपनीचा एक शेअर विकता येतो किंवा विकत घेता येतो अशा प्रकारची प्रणाली अस्तित्वात आली. मुंबईपुरती असलेली बीएसईची कार्यकक्षा रुंदावली व देशभर ब्रोकरमार्फत व्यवसाय होऊ लागला. संगणकीकरणामुळे टी+३ हे वेळापत्रक टी+२ इतके जलद झाले. या सर्व इतिहासाचा एक साक्षीदार या भूमिकेतून जमेल तितक्या घटना, माहिती शब्दबद्ध कराव्यात असे मनात आले. बऱ्याच घटना तारीख-वार यानुसार लिहिण्याचा मानस होता पण दुर्दैवाने यासाठी संग्रहीत केलेली माहिती, दैनंदिन्या इत्यादि सर्व १९९३ च्या बॉम्ब स्फोटात नष्ट झाले त्यामुळे भर केवळ स्मरणशत्तीवर!
जीजीभॉय साहेब चालत कार्यालयात येत असत याचाच फायदा घेऊन कदाचित असेल, १९७४ सालच्या आसपास हमाम स्ट्रीटवर (आताचा अंबालाल दोशी मार्ग) त्यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. कुणी म्हणेल इतक्या चांगल्या माणसाचा शत्रू तरी कोण होता? एका कंपनीचे बेकायदा काम करण्यास नकार दिल्याबद्दल या देवमाणसावर हा हल्ला झाला होता. मागे उल्लेख केली ती ट्रेडिंग रिंगनंतर टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरीत झाली. संगणकीकरण होण्यापूर्वीचा तो काळ होता. ग्राहकांच्या वतीने करायचे खरेदी-विक्री व्यवहार दलाल मंडळी या ट्रेडिंग रिंगमध्ये करीत असत. विकणारा/ विकत घेणारा दलाल (म्हणजे दलालाचा कर्मचारी ज्यांना ट्रेडिंग रिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी खास बिल्ला दिलेला असे) विशिष्ट जागेवर जाऊन ओरडत असे. ज्याला त्याच्याबरोबर सौदा करायचा आहे तो तिथे जाऊन सौदा करीत असे. प्रत्येक दलालाकडे एक लेखनासाठी पॅड असे. त्या कोऱ्या पॅडवर स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्याची सही व शिक्का असे. सौदा नक्की झाल्यानंतर तो या कोऱ्या पॅडवर लिहून दोन्ही दलाल त्यावर सही करीत असत. त्याकाळी अ. ज. शाह हे प्रदीर्घ काळ स्टॉक एक्स्चेंजचे सेक्रेटरी या पदावर होते. त्यांची सही व शिक्का या पॅडवर असे.
अर्थात त्याकाळी संगणकीकरण झाले नसल्यामुळे दलाल गुंतवणूकदाराला जी काँट्रक्ट नोट (बिल) देत असत त्यात पारदर्शकता नव्हती. बरेच वेळा विकणाऱ्याला वेगळा भाव आणि घेणाऱ्याला वेगळा भाव असा वात्रटपणा असे! वात्रटपणा म्हणण्याचे कारण जी वस्तू (इथे शेअर) रामराव ४३५ रुपयांना विकतात ती शंकरराव ४३५लाच घेणार हे ओघानेच आले. मात्र हे दोघे समोरासमोर नसल्याने रामरावांचा दलाल त्यांना बिल देणार त्यात ४३० रुपये असा दर लिहिलेला असेल तर शंकररावांचा दलाल बिल देणार ४३७ रुपयांचे!! एकाने दलाली व्यतिरिक्त पाच रुपये खिशात टाकले तर दुसऱ्याने दोन रुपये. हे एक उदाहरण म्हणून लिहिले आहे. प्रत्येक दलाल असे करीलच असे नाही. पण कमकुवत यंत्रणेचा फायदा घेणार नाही तो व्यापारी कसला? गोंडस भाषेत यालाच ‘फेरभाव’ असे म्हटले जायचे. दुसरी बाब अशी की, सकाळी बाजार सुरू झाल्यापासून तो दुपारी बंद होईपर्यंत शेअरचा भाव कमी जास्त होत असतोच. मात्र मी खरेदी करायला सांगितलेले शेअर्स नक्की केव्हा खरेदी झाले आहेत, हे मला कळायला मार्ग नव्हता. जरी दलालाने मला उच्चतम भाव बिलात लावला तरी मला कळायला मार्गच नव्हता. आता सर्व व्यवहार संगणकीकृत झाल्यामुळे ही शक्यता पूर्णपणे मावळली. व्यवहार पारदर्शक झाले. रामरावांनी चारशे पस्तीस रुपये साठ पसे भावाने विकलेला शेअर शंकररावाना चारशे पस्तीस रुपये साठ पसे भावानेच मिळणार. शिवाय हा व्यवहार कधी झाला त्याचा दिवस आणि वेळ.. हो अगदी सेकंदात देखील काँट्रक्ट नोटमध्ये लिहिलेली आढळते. कारण ही काँट्रक्ट नोट दलाल स्वतच्या संगणकातून बनवीत नसून ती बीएसईच्या संगणकातून निर्माण झालेली असते. पारदर्शकता म्हणतात ती हीच. दलालीची रक्कम अडीच टक्क्यांहून जास्त असणार नाही याची व्यवस्थादेखील संगणकात केलेली असते. म्हणजे कमाल दलाली किती यावर बंधन आहे. कमीत कमी किती दलाली घ्यावे हे त्या त्या दलालाने ठरवावे. डिमॅट व्यवस्थेविषयी पूर्वीच्या लेखातून सविस्तर लिहिले आहेच. १९९६ साली या देशात डिमॅट प्रणाली अस्तित्वात आली, १९९८ साली ते सक्तीचे झाले आणि त्यानंतर सर्व व्यवहार डिमॅट स्वरूपातच होऊ लागले. ज्या लोकांकडे शेअर्स सर्टिफिकेट्स होती त्यापकी सुमारे ९५ टक्के सर्टिफिकेट्स गेल्या १६ वर्षांत डिमॅट झाली आहेत. उरलेली देखील हळूहळू डिमॅट होतील आणि एक दिवस असा उजाडेल की शंभर टक्के डिमॅट!!