करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात भयकंप निर्माण केला असताना, भांडवली बाजारात सलगपणे सुरू असलेल्या निर्देशांकांच्या मुसंडीला शुक्रवारी, बँका, वित्तीय सेवा समभागांतील नफावसुलीने खंड पाडला. सलग पाचव्या दिवशी गडगडलेल्या रुपयाच्या मूल्यानेही बाजारात गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल निर्माण केल्याचे दिसून आले.

शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये चढ-उताराचे हेलकावे सुरूच होते. या अस्थिरतेतच सेन्सेक्सने दिवसाची अखेर ही १५४.८९ अंश खाली ४९,५९१.३२ या पातळीवर केली. बरोबरीनेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ३८.९५ अंशांनी घसरून १४,८३४.८५ वर दिवसअखेर स्थिरावला.

बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक या वित्तीय तसेच बँकिंग समभागांना सलग दुसऱ्या दिवशी नफावसुलीने विक्रीचा मारा सोसावा लागला. रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या पतधोरणामुळे, बुधवारच्या व्यवहारात याच समभागांनी चमकदार झेप घेत चांगली कमाई केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी या वजनदार समभागांनाही विक्रीचा फटका बसला आणि निर्देशांकांच्या घसरणीत याचेच सर्वाधिक योगदान राहिले. माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून निरंतर खरेदीचे पाठबळ मिळताना दिसत आहे. शुक्रवारच्या व्यवहारातही या क्षेत्रातील टेक महिंद्र, बरोबरीने सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉ. रेड्डी आणि टायटन या समभागांचे मूल्य वधारले.

सोमवारी पहिल्याच सत्रात ८७० अंशांच्या मोठ्या आपटीमुळे, सेन्सेक्सने साप्ताहिक स्तरावर ४३८.५१ अंश गमावले आहेत. तर निफ्टीने ३२.५० अंशांची साप्ताहिक तूट दाखविली आहे. चालू आठवड्यातही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा बाजारातील व्यवहारात एकूण कल खरेदीकडेच होता.

‘अतरल’ ३०० समभागांपासून सावधान!

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही आघाडीच्या भांडवली बाजारांनी गुंतवणूकदारांना, तरल आणि रोकडसुलभ नसलेल्या सुमारे ३०० समभागांबाबत विशेष खबरदारीचा इशारा दिला आहे. अशा समभांगांमध्ये व्यवहार करण्यापासून गुंतवणूकदारांना परावृत्त करणारे परिपत्रक या भांडवली बाजारांनी काढले आहे. बीएसई २९९, तर एनएसई १३ समभागांची सूचीही दिली असून, ती दोन्ही बाजारांच्या संकेतस्थळांवर पाहता येईल. अत्यंत तुरळक व्यवहार होणाऱ्या समभागांची टिप्स वजा भूलथापांना बळी पडून खरेदी केली गेली, तरी ते विकते वेळी कोणी खरेदीदार पुढे येणार नसल्याने गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागेल, असा या इशाऱ्याचा अर्थ आहे.

रुपयांत सलग पाचवी घसरण

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य शुक्रवारी सलग पाचव्या व्यवहारात घसरले. करोना महामारीने पुन्हा अर्थव्यवस्थेपुढे उभे अनिश्चिततेच्या आव्हानाचा रुपयाच्या विनिमय मूल्यावर ताण येताना स्पष्टपणे दिसत आहे. शुक्रवारी ते आणखी १५ पैशांनी गडगडले आणि डॉलरमागे ७४.७३ या पातळीवर रोडावले.

चालू महिन्यात आशिया खंडातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये रुपया हे अमेरिकी डॉलरपुढे सर्वाधिक नांगी टाकलेले चलन ठरले आहे. मागील पाच दिवसांत त्याने तब्बल १६१ पैशांची मूल्य घसरण दाखविली आहे. अलीकडच्या काळात रुपयाच्या मूल्यात झालेली ही तीव्र स्वरूपाचीच घसरण ठरली आहे.