मुंबई-पुण्याव्यतिरिक्त राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ‘नाशिक सिटी-ग्रीन सिटी’ हे उद्दिष्ट घेऊन ‘क्रेडाई’ या स्थावर मालमत्ता विकासकांच्या शिखर संस्थेतर्फे सहावे ‘शेल्टर प्रदर्शन’ २० ते २३ डिसेंबर या कालावधीत येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
 क्रेडाईच्या वतीने नाशिकमधील स्थावर मालमत्तांविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी दर दोन वर्षांनी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे प्रदर्शन हे राज्यातील सर्वात मोठे असेल. प्रदर्शनात २५२ स्टॉल्स राहणार असून त्या सर्वाची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण चव्हाण व प्रदर्शन समितीचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी दिली.
या प्रदर्शनामुळे क्रेडाईचे सदस्य असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या नाशिकमधील गृहनिर्माण प्रकल्पांविषयीची संपूर्ण माहिती एकाच छताखाली मिळू शकेल. नाशिकचे भौगोलिक स्थान, उपलब्ध सुविधा आणि नजीकच्या भविष्यातील विकास, यामुळे नाशिकमध्ये कुठे व कशा प्रकारच्या जागा, घरे उपलब्ध आहेत, त्यांचे दर काय आहेत हे, या प्रदर्शनातून पाहण्यास मिळणार आहेत. नाशिकमध्ये घर खरेदीच्या व्यवहारात संपूर्ण पारदर्शकतेची ग्वाही क्रेडाईच्या वतीने देण्यात आली आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या प्र्दशनाची ‘ब्रँड अम्बॅसॅडर’ आहे. राज्याच्या अन्य शहरातूनही हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक येण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.