एचसीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष शिव नाडर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तिमाहीचे निकाल जाहीर करतानाच कंपनीनं शिव नाडर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचीही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी रोशनी नाडर यांच्या हाती कंपनीची अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचसीएलचा नफा जून तिमाहीमध्ये वार्षिक आधारावर ३१.७ टक्क्यांनी वाढला आहे. यादरम्यान कंपनीला २ हजार ९२५ कोटी रूपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी याच कालावधीच कंपनीला २ हजार २२० कोटी रूपयांचा नफा झाला होता.

रोशनी नाडर मल्होत्रा नव्या अध्यक्षा

शिव नाडर यांनी कंपनीचं अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली. सध्या ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून कंपनीच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचंही सांगण्यात आलं. तात्काळ प्रभावानं शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा या अध्यक्षपद साभाळणार आहेत. २०१३ मध्ये एचसीएलटेकच्या संचालक मंडळात अतिरिक्त संचालिका म्हणून सहभागी झाल्या होत्या.

महसूलातही वाढ

एप्रिल आणि जून तिमाहीदरम्यान एचसीएल टेकच्या महसूलात ८.६ टक्क्यांची वाढ होऊन को १७ हजार ८४१ कोटी रूपये झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत कंपनीचा महसूल १६ हजार ४२५ कोटी रूपये इतका होता. तिमाही आधारावर तो ४ टक्क्यांनी आहे. मार्च तिमाहीमध्ये एचसीएल टेकचा महसूल १८ हजार ५९० कोटी रूपये होता. या दरम्यान कंपनीला ११ मोठ्या डील मिळाल्या आहेत.