राज्यात सध्याच्या घडीला १३,७०० पेक्षा अधिक पतसंस्था आहेत. परंतु या सर्वात शिवकृपा सहकारी पतपेढी ही केवळ इतर पतसंस्थांसाठीच आदर्श नव्हे तर एकूण सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी काढले.
शिवकृपाची व्यावसायिक उलाढाल आणि कामगिरी पाहता, रिझव्‍‌र्ह बँक तसेच बडय़ा नागरी सहकारी बँकांनादेखील हेवा वाटेल, इतकेच नव्हे तर आपल्या पारदर्शक कामकाजामुळे तिने सभासद आणि ठेवीदारांमध्ये विश्वासार्हता जपली आहे, असेही चौधरी यांनी पुढे बोलताना सांगितले. शिवकृपाने सप्टेंबर २०१३ अखेर रु. १५६१ कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याच्या निमित्ताने पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित आनंद सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी बोलत होते. मुंबई, ठाणे, सातारा, कोरेगाव व पुणे या पाच विभागांत एकूण ६३ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे ५०० कर्मचारी आणि ९०० ठेव संकलन प्रतिनिधी यांचा हा आनंद सोहळा अलीकडेच पार पडला. एस. पी. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. विजय देव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सोलापूर वस्त्रोद्योग विभागाचे निवृत्त प्रादेशिक उपसंचालक अशोक भांडवलकर या अन्य पाहुण्यांसह झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवकृपाचे अध्यक्ष अविनाश भोसले यांनी भूषविले. संस्थापक संचालक कृष्णा शेलार, संस्थापक व माजी अध्यक्ष चंद्रकांत वंजारी व अन्य आजी- माजी संचालकांची कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती. बडय़ा नागरी सहकारी बँकांना मात देईल असे ठेव संकलन आणि व्यवसाय कामगिरी शिवकृपाने साधली आहे. पतसंस्थेने रु. ८८९ कोटींच्या एकूण ठेवी मिळविल्या, रु. ६६२ कोटींची कर्जे वितरीत केली आहेत.