सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर धातूच्या खरेदीला प्राधान्य देण्यात येतं. यात प्रामुख्याने लोकांचा कल हा सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करण्याकडे अधिक असतो. त्यातच येणारे लग्नांचे मुहुर्त त्यामुळे शुक्रवारी धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सोन्या-चांदीच्या खरेदीला झळाळी आल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात तब्बल ५०० रूपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं. तरीही अनेक ग्राहकांनी सोन्या चांदीच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचं पहायला मिळालं. अनेकांनी आदल्या दिवशीच काही वस्तूचं बुकींग करून ठेवल्याचंही दिसून येत होतं. दरम्यान, दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीमध्ये सोन्याच्या खरेदीला अधिक लोकांनी पसंती दिली.

यावर्षी बाजारावर मंदीचं सावट असल्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या चांदीच्या विक्रीवर मोठा परिणाम होईल, अशा शक्यता अनेक व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. दरवर्षी मुंबईत धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर जवळपास ७०० किलो सोन्याची विक्री होते. परंतु यावेळी थोडा मंदीचा परिणाम विक्रीवर जाणवला. यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी जवळपास ५०० किलो सोन्याची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दसऱ्याच्या मुहुर्तावर जवळपास ३५० किलो सोन्याची विक्री झाली होती.