गेल्या तीन दशकांपासून सल्लागार आणि अभियंता सेवा क्षेत्रात कार्यरत पुणेस्थित मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनीअरिंग सव्र्हिसेस लिमिटेड या कंपनीने, आपल्या भांडवली समभागांच्या खुली प्रारंभिक विक्री येत्या मंगळवार, १५ ऑक्टोबरपासून प्रस्तावित केली आहे. व्यावसायिकरित्या चालविल्या जाणाऱ्या आणि नफाक्षम कंपनीने आपले समभाग राष्ट्रीय शेअर बाजाराने लघू व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध केलेल्या ‘एनएसई इमर्ज’ या मंचावर सूचिबद्ध करण्याचे प्रस्तावित केले आहे. या स्थिर किमतीच्या प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग ६१ रुपयांप्रमाणे एकूण २५.०१ कोटी रुपयांचे भांडवल उभारणे कंपनीला अपेक्षित आहे. जे कंपनीच्या भागविक्रीपश्चात भागभांडवलाचा ३३.८८% हिस्सा व्यापेल. भागविक्रीद्वारे उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा विनियोग मिटकॉनकडून महाराष्ट्राबाहेर विस्तारासाठी केला जाणार आहे. बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथे नवीन कार्यालयांसाठी मालमत्तेचे संपादन आणि  पर्यावरणीय परीक्षण प्रयोगशाळांची स्थापना केली जाणार आहे.
सिंडिकेट बँकेचे गृहकर्ज स्वस्त
मुंबई: स्टेट बँकेसह अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या पंक्तीत सिंडिकेट बँकेनेही गृहकर्ज तसेच वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. सिंडिकेट बँकेचे कोणत्याही रकमेचे गृहकर्ज आता सरसकट पाव टक्क्यांनी स्वस्त होऊन, १०.२५ टक्के व्याजदरावर आले आहे. सिंडिकेट बँकेचा हा बेस रेट म्हणजे निम्नतम आधार दर असून तो सर्वच विद्यमान गृहकर्जासाठीही लागू करण्यात आला आहे. शिवाय वाहन कर्जासाठी चार चाकी वाहनांना १०.९०% व्याजदर तर दुचाकी वाहनांसाठी १२.२५% व्याजदर सणोत्सवाच्या काळात बँकेने अमलात आणला आहे.
‘डिश टीव्ही’कडून स्मार्टफोन, टॅबसाठी नवी सुविधा
मुंबई: डीटीएच सेवेतील अग्रणी डिश टीव्हीने दूरचित्रवाणी प्रक्षेपणाला नवा पैलू प्रदान करताना, कुठेही आणि केव्हाही टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्याची संधी देणारी नवी सुविधा ‘डिश ऑनलाइन’ नावाने सुरू केली आहे. विशेषत: फिरतीवर असताना, स्मार्टफोन, टॅब्लेट्स, लॅपटॉप या माध्यम उपकरणांवर आवडते मनोरंजन आणि कार्यक्रम पाहण्याची संधी प्रेक्षकांसाठी डिश टीव्हीने खुली केली आहे. थेट टीव्ही वाहिन्यांच्या प्रक्षेपण आणि मालिका-कार्यक्रम-सिनेमांचे व्हिडीओ असे या सुविधेचे दोन पर्याय अनुक्रमे केवळ ६९ रु. आणि २९ रु. स्वागतमूल्यांत उपलब्ध झाले आहेत.
‘अरिहंत’कडून आपत्कालीन बचावात्मक यंत्रणा कार्यान्वित
मुंबई: गगनचुंबी इमारतीतून आपत्कालीन स्थितीत कोणत्याही तांत्रिक सहकार्याशिवाय सुखरूप बाहेर काढणारी अनोखी यंत्रणा अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लि.ने राबविली आहे. कंपनीने आपल्या खारघर (नवी मुंबई) येथील निवासी प्रकल्पात देशातील पहिली आणि सर्वात उंच आग तसेच भूकंप बचाव सुविधा साकारली आहे. कोणत्याही यांत्रिक सहकार्याशिवाय (विजेच्या वापराविना) अवघ्या अध्र्या तासात २०० जणांना आपत्कालीन स्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग याद्वारे उपलब्ध झाला आहे. ही यंत्रणा स्वीडनच्या मोबाइलटेक्स एव्हॅक्युशन सिस्टीम्सने विकसित केली आहे.